चाळीस प्रकारची कामे ‘एआय’ खेचणार
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान (एआय) हा सध्याच्या युगातील परवलीचा शब्द आहे. या तंत्रज्ञानामुळे लोकांची कामे जातील, अशी चिंताही व्यक्त केली जात आहे. मायक्रोसॉफ्ट या जगातील क्रमांक एकच्या सॉफ्टवेअर कंपनीने यासंबंधी संशोधन केले असून एक निष्कर्ष अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार जगात 40 प्रकारची कामे हे तंत्रज्ञान अतिशय वेगाने खेचून घेऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अन्य चाळीस प्रकारची कामे काही काळानंतर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाऊ शकतील, असेही मायक्रोसॉफ्टच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा काहीना काही परिणाम सर्वसामान्यांच्या रोजगारांवर होणार हे या संशोधनातून स्पष्ट होत आहे.
जी कामे त्वरित खेचली जाऊ शकतील, त्यांच्यात इतिहासतज्ञ, लेखक आणि स्तंभलेखक, ग्राहक सेवा प्रतिनिधी, सीएनसी टूल्स प्रोग्रॅमर्स, तिकीट एजंट आणि ट्रॅव्हल क्लार्क, वृत्तविश्लेषक आणि पत्रकार, संपादक आणि मुद्रितशोधक (प्रूफ रीडर्स) पब्लिक रिलेशन्स ऑफीसर्स, डाटा तज्ञ, टेक्निकल रायटर्स, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, गणिततज्ञ इत्यादी कामांचा समावेश आहे. मात्र, याचा अर्थ ही कामे जातील आणि ती करणाऱ्या लोकांवर घरी बसण्याची वेळ येईल, असा नाही. मात्र, ही कामे करणाऱ्यांचा मोठा भार हे तंत्रज्ञान उचलू शकेल. तसेच त्यांना साहाय्य करु शकेल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, जी कामे शारीरक श्रमाची किंवा शरिरीक शक्तीचा ज्या कामांमध्ये उपयोग आवश्कय असतो, ती कामे या तंत्रज्ञानामुळे कमीत कमी प्रमाणात प्रभावित होतील, असेही या संशोधनातून स्पष्ट होत आहे. यावर आणखी संशोधन होणार आहे.