एआय तंत्रज्ञानामुळे नवीन औद्योगिक क्रांती
इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मश्री ए. एस. किरणकुमार : आरसीयूचा 14 वा दीक्षांत सोहळा उत्साहात : सुवर्ण विधानसौधमध्ये आयोजन
बेळगाव : जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी भारत देश एक आहे. येत्या काही वर्षात आपली अर्थव्यवस्था एक ट्रीलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. भारताला अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी संधी आहे. सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान तयार केले जात असून इतर देशांनाही ते पुरविले जात आहे. त्यामुळे देशातील तरुणांना ज्ञान व कौशल्य मिळविण्याची मोठी संधी आहे. एआयमुळे आरोग्य, उद्योग, वाहतूक या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. यामुळे एक नवीन औद्योगिक क्रांती घडण्याची शक्यता असून ती पूर्वीच्या क्रांतीपेक्षा अधिक मोठी असेल, असे उद्गार इस्त्रोचे माजी अध्यक्ष पद्मश्री ए. एस. किरणकुमार यांनी काढले. राणी चन्नम्मा विद्यापीठाचा (आरसीयू) 14 वा वार्षिक दीक्षांत सोहळा मंगळवारी सुवर्ण विधानसौध सभागृहात पार पडला.
या सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यपाल थावरचंद गेहलोत, कुलगुरु सी. एम. त्यागराज यांच्यासह विद्यापीठाचे प्राध्यापक उपस्थित होते. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, पदवी अभ्यासक्रमावेळी आत्मसात केलेले ज्ञान व शिक्षणाचा वापर देशाच्या समृद्धीसाठी करावा. विद्यापीठाची नवी इमारत पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष विद्यापीठाच्या नव्या इमारतीत होईल. भारत विश्वगुरुच्या दिशेने वाटचाल करीत असून तरुणाईचा यामध्ये सर्वाधिक वाटा असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. कुलगुरु प्राध्यापक सी. एम. त्यागराज यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. पीएम उषा योजनेतून 100 कोटी रुपयांचा निधी विद्यापीठाला मिळाला असून त्यातून विकासकामे राबविली जात आहेत. त्याचबरोबर आयआयटी बॉम्बेचा इमर्जिंग विद्यापीठाचा पुरस्कार मिळाल्याने विद्यापीठाचे महत्त्व वाढले असल्याचे कुलगुरुंनी स्पष्ट केले.
तिघांना मानद डॉक्टरेट
सामाजिक,शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल आरसीयूकडून तिघा जणांना मानद डॉक्टरेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रासाठी डॉ. शिवाजी कागणीकर, शैक्षणिक क्षेत्रासाठी विनोद दोड्डण्णावर व साहित्य क्षेत्रासाठी विजापूर जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलिगार यांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.