वैज्ञानिकांनाही एआयने टाकले मागे
48 तासांत पूर्ण केले कित्येक वर्षांपासून प्रलंबित काम
सद्यकाळात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स लोकांना अत्यंत उपयुक्त ठरत असून त्याच्या मदतीने लोक स्वत:चे काम बऱ्याचअंशी सहजपणे करत आहेत. अशाप्रकारे एका नव्या एआय टूलने केवळ 48 तासांमध्ये सुपरबगच्या रहस्याची उकल करत वैज्ञानिकांना थक्क केले आहे. मायक्रोबायोलॉजिस्टस या जटिल मुद्द्याला सुमारे एक दशकापेक्षा अधिक काळापासून समजून घेण्याच्या प्रयत्नात होते. इंपिरियल कॉलेज लंडनचे प्राध्यापक जोस पेनोडेस आणि त्यांच्या टीमने अनेक वर्षे सुपरबग अँटीबोयोटिक औषधांपासून का प्रतिरक्षित आहेत याचा शोध घेत होते.
यानंतर पेनाडेस यांनी हा मुद्दा निकाली काढण्यासाठी गुगलच्या एआय टूलचा वापर करण्याचा निर्णय घेतला. या एआयने केवळ 48 तासांमध्येच निष्कर्ष काढला, जो अत्यंत चकित करणारा होता. हा शोध अद्याप प्रकाशित झाला नव्हता. याचा अर्थ एआय हे सार्वजनिक डोमेनमधून अॅक्सेस करू शकत नव्हता, यामुळे सर्वाधिक आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पेनाडेस आणि त्यांच्या संशोधकांची टीम काही सुपरबग, हानिकारक बॅक्टेरियाच्या निर्मितीवर विचार करत होती, जे अँटीबायोटिक औषधांबद्दल प्रतिरोधक असतील. हे संशोधक पेनाडेस यांच्या टीमसाठी अत्यंत चकित करणारे होते. टीमने गुगलच्या एआय टूलद्वारे याचे परीक्षण केले असता केवळ दोन दिवसांमध्ये त्यांच्या संशोधनाची पुष्टी झाली, जे त्यांच्या निष्कर्षांशी पूर्णपणे मिळतेजुळते होते.
मानवी मेंदूला टाकले मागे
एआय टुलने केवळ आमच्या संशोधनांचा पुनरुच्चार केला नसून अपेक्षेहून अधिक सरस कामगिरी केली आहे. एआयने केवळ योग्य परिकल्पना प्रदान केली नसून आणखी चार सूचना केल्या, ज्या सर्वांना मान्य होत्या. ही परिकल्पना आम्हाला कधीच सुचली नव्हती, आता त्यावर आमची टीम काम करत असल्याचे पेनाडेस यांनी सांगितले आहे.