अमेरिका, ब्रिटन यांच्यात एआय करार
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन महासंघ यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधातील (एआय) करार केला आहे. हा या विषयावरचा जगातील प्रथमच आंतरराष्ट्रीय आणि कायदेशीररित्या बंधनकारक करार आहे. या करारासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून पूर्वतयारी करण्यात येत होती. मे 2024 मध्ये या कराराच्या प्रारुपाला मान्यता देण्यात आली होती. गुरुवारी त्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असून त्याचे जसे अनेक उपयोग आहेत, तसे त्यापासून अनेक धोकेही संभवतात. या धोक्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठीच्या तरतुदी या करारात आहेत. मानवाधिकार आणि कायद्याचे राज्य या संकल्पनांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे बाधा पोहचू नये, याची दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याने हा करार करण्यात आला आहे.
57 देशांशी चर्चा
कराराचे प्रारुप तयार करण्यापूर्वी 57 देशांची प्रशासने आणि तज्ञांची चर्चा करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान मूठभर देशांच्या हाती असू नये. त्यावर कोणाचा एकाधिकार राहू नये. या तंत्रज्ञानाचा लाभ संपूर्ण जगाला व्हावयास हवा, अशी मागणी भारतासह अनेक देशांनी केली आहे. याशिवाय अनेक देशांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा केला जावा, यासंबंधी अनेक सूचना केल्या आहेत.
मानवाधिकारचा प्रश्न महत्त्वाचा
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी होऊ शकतो. तसेच समाजाची दिशाभूल करण्यासाठीही केला जाऊ शकतो. त्यामुळे या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच या तंत्रज्ञानाचा दुरुपयोगापासून मानवाधिकार आणि खासगीत्वाचा अधिकार यांचे संरक्षण करणे ही बाब महत्वाची ठरते. याच बाबीचा प्रामुख्याने विचार या करारात करण्यात आला आहे, अशी माहिती ब्रिटनच्या सरकारने दिली आहे.
युरोपियन मंडळाची भूमिका महत्त्वाची
युरोपियन मंडळाची स्थापना 1949 मध्ये करण्यात आली होती. हे मंडळ युरोपियन महासंघापासून भिन्न आहे. या मंडळाची स्थापना मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी प्रामुख्याने करण्यात आली आहे. या मंडळाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दुरुपयोगापासून मानवाधिकारांचे संरक्षण कसे करता येईल, या संबंधात समर्पक सूचना केल्या आहेत. त्यांचाही अंतर्भाव या करारात करण्यात आला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?
कृत्रिम बुद्धिमत्ता हे अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान असून त्याचे अनेक उपयोग आहेत. चॅटजीपी आदी सॉफ्टवेअर्समध्ये त्याचा उपयोग करण्यात येतो. अनेक जटील कामे या तंत्रज्ञानामुळे सहजगत्या करता येतात. त्यामुळे मानवी परिश्रम, वेळ आणि ऊर्जा यांची बचत होऊ शकते. वैद्यकीय सेवा, शिक्षण, दूरसंचार आदी क्षेत्रांच्या प्रसार आणि विस्तारासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. मात्र, याचा दुरुपयोग करुन विशिष्ट व्यक्तींची बदनामी करण्यात आल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा नियंत्रित उपयोग आवश्यक आहे. हा करार या नियंत्रणाच्या दिशेने टाकलेले प्रथम पाऊल मानण्यात येत आहे.