धक्कादायक! अहमदनगर-आष्टी डेमू रेल्वेला भीषण आग; पाचपैकी दोन डबे जळून खाक
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर विभागातील अहमदनगर- आष्टी डेमू रेल्वेला भीषण आग लागली आहे. रेल्वे शिराडोह परिसरामध्ये असताना ही आग लागल्याचे वृत्त आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दल पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरमधील शिराडोह परिसरात रेल्वेला आग लागली. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. रेल्वेच्या दोन डब्यातून धूर येताना दिसताच सर्व प्रवाशांना सुखरूप गाडीबाहेर काढण्यात आले, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र या भीषण आगीमुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यद्धपातळीवर प्रयत्न केले गेले.
आग नेमकी कशामुळे लागली आहे, याची चौकशी करण्यात येणार आहे. या रेल्वेमधील प्रवासी तत्काळ बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या गाडीला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याने प्रवाशांची गर्दी नव्हती.
ठळक बाबी....
-गाडी क्रमांक 01402 न्यू आष्टी ते अहमदनगर डेमूला आग
- नारायणडोह ते अहमदनगर दरम्यानची घटना
- रेल्वेच्या पाच डब्यांना दुपारी तीनच्या सुमारास आग
- गार्ड-साइड ब्रेक व्हॅन आणि त्याला लागून 4 डबे.
- तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
- कोणतीही जीवितहानी नाही आणि कोणतीही दुखापत नाहीत
- आग पसरण्यापूर्वी रेल्वेमधील सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरले
- दौंडहून घटनास्थळी रेल्वे एआरटी (अपघात मदत गाडी) दाखल
- अग्निशमन दलाच्या एकूण 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या