अहमदाबाद 2025 मध्ये तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
वृत्तसंस्था / अहमदाबाद
अहमदाबाद शहर यावर्षी कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपसह तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार आहे, अशी घोषणा मंगळवारी करण्यात आली. 2025 मधील तीन प्रमुख स्पर्धा-कॉमनवेल्थ, वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप, आशियाई एक्वाटिक्स चॅमिपयनशिप आणि एएफसी अंडर 17 आशियाई कप फुटबॉल पात्रता-जगभरातील प्रतिष्ठित खेळाडू गुजरात शहरात आणतील, असे अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. व्यापार आणि उद्योगासाठी प्रदीर्घ काळापासून ओळखले जाणारे गुजरात आता जागतिक क्रीडा मंचावर आपली छाप पाडण्यास सज्ज आहे, असेही त्यात म्हटले आहे. प्रतिष्ठित कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान अहमदाबादमधील नारणपुरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केली जाईल. 29 देशांमधील 250 हून अध्घ्कि खेळाडू या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आशियाई एक्वाटिक्स चॅम्पियनशिप होईल. ज्यामध्ये चीन, जपान आणि कोरिया सारख्या देशांचे जलतरणपटू सहभागी होतील. उल्लेखनिय म्हणजे, 22 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या एएफसी अंडर 17 आशियाई चषक 2026 पात्रता फेरीसाठी भारत सात यजमान देशांपैकी एक आहे. भारतात नियोजित सर्व फुटबॉल सामने अहमदाबादमधील ‘द एरिना बाय ट्रॉन्सस्टॅडिया’ येथे होतील. अहमदाबादमध्ये होणाऱ्या पात्रता फेरीत गट डी सामने होतील. ज्यामध्ये भारत, इराण, चायनज तैपेई आणि लेबनॉन सारखे देश सहभागी होतील.
2026 मध्ये अहमदाबाद आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि आर्चरी आशिया पॅरा कप ही जागतिक क्रमवारी स्पर्धा देखील आयोजित करेल. याव्यतिरिक्त भारताने जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळ 2029 चे आयोजन करण्याचा मान मिळवला आहे आणि ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा अहमदाबाद, गांधीनगर आणि गुजरातमधील एकतानगर (केवडिया) येथे आयोजित केली जाईल. अलिकडेच 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारताच्या बोलीला मान्यता देण्यात आली आणि या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून निवड करण्यात आली आहे. हे सर्व कार्यक्रम राज्याला बहु-क्रीडा उच्च-कार्यक्षमता असलेले ठिकाण म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरतील, असे प्रकाशनातून म्हटले आहे. 2022-27 च्या नवीन क्रीडा धोरणासह आधुनिक क्रीडा संकुल आणि प्रगत सुविधांसह गुजरात आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात सक्षम झाला आहे, असे त्यात म्हटले आहे.