For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्वच्छ’ शहरात अहमदाबाद देशात प्रथम

06:05 AM Jul 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘स्वच्छ’ शहरात अहमदाबाद देशात प्रथम
Advertisement

स्वच्छता सर्वेक्षण-2024’ : भोपाळ दुसऱ्या तर लखनौला तिसरा क्रमांक : 17 जुलैला पुरस्कार वितरण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने स्वच्छता सर्वेक्षण-2024 चे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये देशात गुजरातमधील अहमदाबादने अनेक शहरांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच भोपाळने देशात दुसरे स्थान मिळवले आहे. गेल्यावर्षी भोपाळ पाचव्या स्थानावर होते. उत्तर प्रदेशमधील लखनौ शहराने मागील वर्षीच्या 44 व्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. बऱ्याच वर्षांपासून ‘टॉप’वर असलेल्या इंदूर शहराचे स्थान घसरले असले तरी ‘सुपर स्वच्छता लीग’मध्ये इंदूरसह 15 शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत गुरुवार, 17 जुलै रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या सोहळ्यात अव्वल शहरांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विविध शहरांना आमंत्रण मिळाले आहे. मात्र, पुरस्कार विजेत्यांची अधिकृत घोषणा कार्यक्रमस्थळीच केली जाईल. यंदाच्या म्हणजेच ‘स्वच्छता सर्वेक्षण-2024’मध्ये ‘सुपर स्वच्छता लीग’ नावाची एक नवीन श्रेणी जोडण्यात आली होती. यामध्ये दोन वर्षे टॉप-3 मध्ये असलेली शहरे समाविष्ट करण्यात आली होती. परंतु एक दिवस आधी ती बदलून कालावधी 3 वर्षांचा करण्यात आला. गेल्यावेळी लीगमध्ये फक्त 12 शहरे होती, आता या शहरांची संख्या 15 झाली आहे. इंदूर सलग सात वेळा देशातील नंबर-1 स्वच्छ शहर बनले होते. परंतु यावेळी ते सुरत आणि नवी मुंबईसह रँकिंगच्या बाहेर राहील, कारण स्वच्छता सुपर लीगमध्ये समाविष्ट शहरांना रँकिंग देण्यात आलेले नाही.

देशातील सर्व शहरांना स्वच्छता व्यवस्थेच्या आधारे 12,500 पैकी गुण दिले जातात. दरवर्षी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये (50 हजारांपेक्षा जास्त आणि 10 लाखांहून अधिक लोकसंख्या) अव्वल स्थान मिळवणारी काही शहरे सतत टॉप-3 मध्ये राहिली. त्यामुळे इतर शहरांसाठी स्पर्धेची जागा मर्यादित राहिली.

मध्यप्रदेशातील 5 शहरांनाही पुरस्कार मिळतील, सुपर लीगमध्ये 3 शहरे भोपाळ, देवास आणि शहागंज राष्ट्रपती पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. जबलपूर आणि ग्वाल्हेरला राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आमंत्रण मिळाले आहे. त्याचवेळी, इंदूर, उज्जैन आणि बुडनी सुपर लीगमध्ये आहेत. उज्जैन हा मुख्यमंत्री मोहन यादव यांचा गृहजिल्हा आहे, तर बुडनी हे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे क्षेत्र आहे.

Advertisement
Tags :

.