अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्यावर पोहोचले अहमद अल शरा
1946 नंतर सीरियन अध्यक्षांचा पहिला अमेरिका दौरा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
सीरियाचे अध्यक्ष अहमद अल शरा हे अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. 1946 नंतर पहिल्यांदाच एखादा सीरियन अध्यक्ष अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर असल्याने हा अत्यंत ऐतिहासिक दौरा आहे. सीरियाच्या अध्यक्षांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीतून एक दिवस अगोदरच अमेरिकेने हटविले आहे.
अहमद अल शरा हे वॉशिंग्टनमध्ये सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी मे महिन्यात ट्रम्प यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता, त्यावेळी सौदी अरेबियाच्या रियाध शहरात देखील ट्रम्प आणि शरा यांची भेट झाली होती. अहमद अल शरा यांच्या या अमेरिका दौऱ्यावर सीरियाचे सरकार, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटविरोधातील अमेरिकेच्या नेतृत्वातील आघाडीत सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी करू शकते.
दहशतवादी यादीतून नाव हटले
अमेरिका सीरियाची राजधानी दमास्कसनजीक एक सैन्यतळ निर्माण करण्याची योजना आखत आहे. या सैन्यतळाचा उद्देश मानवीय सहाय्याच्या कार्यांमध्ये समन्वय निर्माण करणे असल्याचे सांगण्यात येत आहे. अहमद अल शरा यांनी सीरियात बेपत्ता अमेरिकन नागरिकांचा शोध घेणे आणि उर्वरित रासायनिक अस्त्रांचा साठा नष्ट करण्यास सहमती दर्शविली आहे, याचमुळे त्यांचे नाव दहशतवाद्याच्या यादीतून हटविण्यात आल्याचे अमेरिकेच्या विदेश विभागाने सांगितले आहे. यापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेने देखील अहमद अल शरा यांच्यावरील निर्बंध हटविले होते, यामुळे शरा यांनी सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला संबोधितही केले होते. ही कामगिरी करणारे ते पहिले सीरियन अध्यक्ष आहेत.
अल-कायदाशी संबंध
अहमद अल शराची यापूर्वीची संघटना हयात तहरीर अल-शामचे (एचटीएस) क्रूर दहशतवादी संघटना अल-कायदाशी संबंध होते. याचमुळे अमेरिका आणि सुरक्षा परिषदेने शराचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत सामील केले होते. परंतु सीरियाची सत्ता त्याने स्वत:च्या हाती घेतल्यापासून स्वत:च्या उग्रवादी भूतकाळापासून दूर राहत सीरियन जनता आणि आंतरराष्ट्रीय समुदायासमोर एक अधिक उदारमतवादी प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे.