कृषी खात्याकडून तेलबिया उत्पादनासाठी अर्जाचे आवाहन
संघ-संस्था, शेतकरी उत्पादक संघटनांना करता येणार अर्ज : 31 जुलै शेवटची तारीख
बेळगाव : स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कृषी खात्याकडून पावले उचलण्यात येत आहेत. 2025-26 सालासाठी तेलबिया पिकांच्या मूल्य साखळीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व तेलबिया योजनेंतर्गत तेलबियांच्या प्राथमिक आणि दुय्यम कापणीनंतरच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी खात्याकडून अर्जाचे आवाहन करण्यात आले, अशी माहिती कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. केळेकर यांनी दिली. यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी सरकारी, गैरसरकारी संस्था, शेतकरी उत्पादक संघटनांनी आपल्या सविस्तर प्रकल्प अहवालासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या अर्जांची पडताळणी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड कार्यकारी समितीमार्फत करण्यात येणार आहे. इच्छुकांना अर्ज करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक संघ संस्था व शेतकरी उत्पादक संघटनांनी अर्ज करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा 9.99 लाखांपेक्षा जास्त नसलेले अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी इमारत व भाड्याचा खर्च विचारात घेतला जाणार नसून अर्जदारांना सदर खर्च स्वत:च करावा लागणार आहे. तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी खात्याकडून अनेक विविध उपक्रम राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनीही याचा लाभ घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या शेतकरी संपर्क केंद्राशी किंवा साहाय्यक कृषी उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
उत्पादकांच्या समस्यांची दखल घेण्याची गरज
वाढत्या खाद्यतेलाचे दर लक्षात घेऊन शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी तेलबिया पिकांवर अधिक भर देण्यात येणार असून, शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व तेलबिया योजनेंतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा फायदा घेत उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कृषी खात्याकडूनही उत्पादकांच्या समस्यांची दखल घेऊन त्यांना पुन्हा उभारी देण्याची आवश्यक आहे.