Satara News: ओल्या दुष्काळावरुन दोन मंत्री अन् शशिकांत शिंदे भिडले
मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले ओल्या दुष्काळाचे निकष
सातारा : कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी 93 टक्के पेरण्या झाल्याचा आकडा जाहीर करता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा यांच्या समोरच ही आकडेवारी कधीपर्यंतची आहे.
पेरणी कधीपर्यंत केली जाते, काहीही आकडेवारी जाहीर करता काय?, 93 टक्के सांगता, त्यापैकी किती उगवण झाली हे सांगा, असे सांगत त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी करताच त्यांच्यात आणि मकरंद आबा यांच्यात शाब्दीक शीतयुद्ध रंगले होते. दरम्यान, मकरंद आबांनीही त्यांना ओल्या दुष्काळासाठी वेगळे निकष असतात असे उत्तर देत आढावा बैठक पार पडली.
जिह्यात झालेल्या पावसामुळे नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नियोजन भवनात बैठकीचे आयोजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले होते. यावेळी मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद आबा, खासदार नितीन काका, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आढावा बैठकीत आपत्ती व्यवस्थापन विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग यांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या अहवालाचा आढावा घेत असताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या की शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करताना कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल यांनी शेताच्या बांधावर जावून पंचनामे करावेत. पुन्हा कोणाची तक्रार येता कामा नये, आमचा पंचनामा राहिला अशी, अशा सूचना त्यांनी केल्या.
तसेच मंत्री मकरंद पाटील म्हणाले, मे महिन्यात पाऊस सुरु झाला. त्या पावसाने जे नुकसान झाले त्याची मदत शासनाने पाठवली आहे. ती कोणाला मिळाली नाही हे तपासा, ती रहायला नको याची खात्री करा, आमच्या वाई नगरपालिकेने 7 कोटींचा आकडा दिला आहे तसा आकडा फुगवून देवू नका. वस्तुस्थितीदर्शक आकडा द्या, अशा सूचना दिल्या.
प्रशासनाच्यावतीने माहिती देताना सांगण्यात आले की जिह्यात 14 हजार 687 शेतकरी बाधित असून त्यांच्या नुकसान भरपाईला 7 कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे. 6 हजार जणांची ई केवायसी राहिल्याने त्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरु आहे. वाईतील 94 आणि पाटणमधील 175 शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अजून 6 लाख 48 हजार रुपयांचा निधी लागणार आहे.
1983 घरांची पडझड झाली असून त्यातील 168 लाभार्थ्यांचे पॅनकार्ड नसल्याने मदत देण्यात अडचण येत आहे. 1 मृत व्यक्तीला 4 लाख तर 65 जनावरे आणि 171 कोंबड्या मृत पावल्या होत्या. त्यांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दिली आहे, असे आढाव्यात सांगितले.
शेजारीशेजारीच मंत्री मकरंद आबा आणि आमदार शशिकांत शिंदे हे बसलेले होते. जेव्हा कृषी विभागाने 93 टक्के पेरणी जिह्यात झाल्याचे सांगताच शशिकांत शिंदे यांनी त्यावर आक्षेप नोंदवला. पेरण्या कधीपर्यंत होतात ते सांगा, 93 टक्के पेरण्या झाल्या म्हणता किती टक्के उगवून आले तेही सांगा, शेताच्या बांधावर जावून टक्केवारी काढली का?, येथे शेती पाण्याखाली आहे, ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, का होवू शकत नाही ओला दुष्काळ, असा प्रश्न मांडताच मंकरद आबांनी ओल्या दुष्काळाला निकष वेगळे आहेत त्यात आपण बसत नाही, असा खुलासा केला.
त्यावर शशिकांत शिंदेनी मकरंद आबांकडे रोख धरत मंत्री महोदयांना ओला दुष्काळ जाहीर करायचे नाही, सर्वच विभागांनी प्रॅक्टीकली अहवाल द्यावा, अशीही टीप्पणी केली. दरम्यान, पाहणीचे फोटो पीपीटीमध्ये दाखवत असताना शशिकांत शिंदे यांनी सर्वच आमदारांचे असे फोटो दाखवा, हे पाहणी दौऱ्याचे आताचे फोटो आहेत का?, अशी कोपरखळी मारली.
मी 2, 3 हजाराने निवडून येत नाही
पत्रकार परिषद झाल्यानंतर पत्रकारांनी मंत्री मकरंद आबांना प्रश्न छेडला की तुम्ही मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदार संघात कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा आधिकार आहे. मी काय 2, 3 हजाराने निवडून येणारा नाही, मोठ्या फरकाने निवडून येणारा आहे, असे मार्मिक उत्तर देत मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर नाव न घेता टीप्पणी त्यांनी केली.
आलटून पालटून खड्डे
पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्रकारांनी सातारा शहरातील खड्ड्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जलमंदिरही साताऱ्यात आहे, सुरुचीही साताऱ्यात आहे आणि माझे निवासस्थानही साताऱ्यात आहे. खड्डे आलटून पालटून पडतात, असे खुमासदार उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले.
दरम्यान, डॉल्बीच्या ज्येष्ठ नागरिकांच्या लढ्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, जे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार डॉल्बी वाजवण्यास मनाई नाही. परंतु कर्णकर्कश आवाज होत असेल तर कारवाई ही होणारच, असेही त्यांनी निक्षून सांगितले.