पांत्सिर संरक्षण प्रणालीसाठी भारत-रशिया यांच्यात करार
ट्रॅकिंग प्रणाली हवेत 36 किमी अंतरावरील लक्ष्य वेधण्यास सक्षम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची हवाई संरक्षण प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी भारत डायनॅमिक्स लिमिटेडने (बीडीएल) रशियासोबत नवीन करार केला आहे. हा करार रशियन सरकार-नियंत्रित शस्त्रास्त्र निर्यात करणारी कंपनी रोसोबोरोनेक्सपोर्ट (आरओई) सोबत प्रगत पांत्सिर हवाई संरक्षण क्षेपणास्त्र तोफा प्रणालीसाठी केला गेला आहे.
पांत्सिर एअर डिफेन्स सिस्टीम हे विमान, ड्रोन आणि अचूक मार्गदर्शित युद्धसामग्रीसह हवाई हल्ल्यांपासून लष्करी तळ आणि इतर पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले एक बहुमुखी मोबाइल प्लॅटफॉर्म आहे. यात प्रगत रडार आणि ट्रॅकिंग यंत्रणा असून ती 36 किमी दूर आणि 15 किमी उंचीवरील लक्ष्यावर अचूकपणे हल्ला करण्यास सक्षम आहे. गोव्यात झालेल्या पाचव्या भारत-रशिया आंतर सरकारी आयोगाच्या (आयआरआयजीसी) उपसमूह बैठकीत दोन्ही देशांमधील या संरक्षण प्रणालीसाठीच्या या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
मेक इन इंडिया उपक्रमाचा भाग असलेल्या या कराराचे उद्दिष्ट उत्पादन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि पांत्सिर प्रकाराच्या संयुक्त विकासासाठी नवीन मार्ग शोधण्याचे आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संरक्षण उत्पादनात स्वावलंबी होण्याच्या भारताच्या लक्ष्यामध्ये याचा समावेश आहे. भारताने 2018 मध्ये रशियाकडून ए-400 हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी 5 अब्ज डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली होती. या करारानुसार भारताला पुढील 5 वर्षांत या सर्व हवाई संरक्षण यंत्रणा मिळणार होत्या. आतापर्यंत रशियाने भारताला फक्त 3 हवाई संरक्षण यंत्रणा दिली आहे. भारताला अजून 2 ए-400 विमाने मिळालेली नाहीत. सध्या रशियाचे युव्रेनशी युद्ध सुरू असल्यामुळे हवाई संरक्षण प्रणालीच्या वितरणास विलंब होत आहे.