सीमा विवादाबाबत भारत-चीनमध्ये करार
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली कराराची सविस्तर माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि चीनदरम्यान सीमा विवादासंबंधी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत महत्त्वपूर्ण करार झाला आहे. भारत आणि चीनमध्ये पुन्हा गस्त घालण्यावर एकमत झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी दिली. विशेष म्हणजे ही महत्त्वाची घडामोड पंतप्रधान नरेंद्र मोदी 16व्या ब्रिक्स परिषदेसाठी रशियाला जाण्यापूर्वी घडली आहे. रशियामध्ये 22 ते 23 ऑक्टोबर दरम्यान ब्रिक्सची बैठक होणार आहे.
गेल्या अनेक आठवड्यांपासून झालेल्या चर्चेच्या फलनिष्पत्तीतून भारत-चीन सीमाभागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त व्यवस्थेवर एक करार झाला असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली. 2020 मध्ये या क्षेत्रांमध्ये उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. करारानुसार, दोन्ही देशांचे सैन्य डेपसांग आणि डेमचोकमधील आपल्या जुन्या ठिकाणी परत जातील. तसेच करारान्वये बफर झोनमध्ये गस्त घालण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
एलएसी वादावर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारानुसार आता भारतीय सैनिक पुन्हा एकदा डेपसांग आणि डेमचोकमध्ये गस्त घालू शकतील. याशिवाय उर्वरित चार बफर पॉईंटवरही गस्त सुरू होणार आहे. येथे प्रथम पँगोंगच्या फिंगर एरियातून आणि गलवानच्या पीपी-14 मधून विघटन झाले. यानंतर चिनी सैनिकांनी गोगरा येथील पीपी-17 मधून माघार घेतली आणि त्यानंतर हॉट स्प्रिंग भागातील पीपी-15 मधून सैन्य माघारी गेले. आतापर्यंत या बफर झोनमध्ये भारतीय सैनिक किंवा चिनी सैनिक गस्त घालत नव्हते. मात्र, आता या गस्ती केंद्रांवर पुन्हा गस्त सुरू करण्याचा करार दोन्ही देशांमध्ये झाला आहे.
चीनसोबत राजनैतिक, लष्करी चर्चा
ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संभाव्य द्विपक्षीय बैठकीबाबत विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि चीन यांच्यात अलीकडच्या काही आठवड्यात राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू आहेत. आम्ही अद्याप कोणत्याही द्विपक्षीय बैठकीसाठी वेळ आणि तपशीलांबाबत समन्वय साधत आहोत. 2020 पासून भारत आणि चीनमध्ये सीमा विवाद आहे. चीनने सीमेवरील स्थिती बदलल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला होता. गलवानमध्ये चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाल्यानंतर दोन्ही देशांकडून ‘एलएसी’वर सैन्याची तैनाती वाढवण्यात आली होती.
गलवान चकमकीनंतर तणाव वाढला
2020 मध्ये 15-16 जून रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये 20 भारतीय जवान हुतात्मा झाले होते. तर चीनचेही जवळपास दुप्पट सैनिक मारले गेले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये मारल्या गेलेल्या चिनी सैनिकांची संख्या 35 असल्याचे सांगण्यात आले. मात्र, चीनने केवळ 3 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.
ब्रिक्स परिषदेत मोदी-जिनपिंग भेट
ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या कझान शहराला भेट देण्याच्या एक दिवस आधी या महत्त्वाच्या कराराची घोषणा करण्यात आली. आता ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची द्विपक्षीय बैठक होण्याची शक्मयता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
भारत-चीन दरम्यान 3,488 किमी लांबीची सीमा
भारत आणि चीनमध्ये 3,488 किलोमीटर लांबीची सीमा आहे. दोन्ही देशांची सीमा लडाखमध्ये 1,597 किमी, अऊणाचल प्रदेशमध्ये 1,126 किमी, उत्तराखंडमध्ये 345 किमी, सिक्कीममध्ये 220 किमी आणि हिमाचल प्रदेशमध्ये 200 किमी आहे. 1962 च्या युद्धात चिनी सैनिक अऊणाचल प्रदेश आणि लडाखच्या अक्साई चीन परिसरात घुसले होते. भारतीय लष्कराने अऊणाचलमधून चिनी सैनिकांना हुसकावून लावले होते. पण, चिनी सैनिकांनी अक्साई चीन ताब्यात घेतला होता. अक्साई चीन लडाखला लागून असून सुमारे 38 हजार चौरस किलोमीटर आहे. भारत आणि चीनदरम्यान लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. ही एक प्रकारची सीजफायर लाईन आहे. 1962 च्या युद्धानंतर दोन्ही देशांचे सैन्य तैनात असलेल्या सीमेला एलएसी मानले जात आहे.