‘टीडीपी’शी जमलंय, ‘बीजेडी’शी बिनसलंय!
भाजपची लोकसभा जागावाटपासंबंधी चर्चा :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. अनेक नेते बाजू बदलण्यात व्यस्त आहेत. त्याचवेळी भाजप आणि काँग्रेस आपापल्या आघाडी मजबूत करण्यात व्यस्त आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि तेलगु देसम पार्टी (टीडीपी) यांच्यातील युती जवळपास निश्चित झाली असून जागावाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ओडिशातील नवीन पटनायक यांच्या ‘बीजेडी’शी सुरू असलेली बोलणी फिस्कटल्याचे समजते. ‘रालोआ’चे पक्षबळ वाढविण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असले तरी काही पक्षांसोबत जागावाटपावरून बरीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे.
भाजपने टीडीपीसोबत जागावाटपासंबंधी बोलणी पूर्ण झाली आहेत. आता भाजप अध्यक्ष जे. पी. न•ा, टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि जनसेना अध्यक्ष पवन कल्याण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अंतिम शिक्कामोर्तब होईल. भाजप आणि जनसेना लोकसभेच्या 8 जागांवर एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून विधानसभेच्या 30 जागांवरही बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. चंद्राबाबू नायडू गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीतच होते. आता युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर टीडीपी आणि भाजप एकत्रितपणे प्रचाराच्या तयारीला लागतील. येत्या 17 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौऱ्यावर जाणार असून यावेळी प्रचारसभेत चंद्राबाबू नायडूही व्यासपीठावर दिसण्याचे संकेत मिळत आहेत.
लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका
आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. अशा स्थितीत जागावाटपात विलंब होत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप 25 पैकी 6 जागांची मागणी करत आहे, तर टीडीपी 4 जागा देण्यास तयार आहे. अशास्थितीत भाजप आणि जनसेना या दोन्ही पक्षांनी मिळून लोकसभेच्या 8 आणि विधानसभेच्या 30 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
भाजप-बीजेडी युतीची चर्चा फसली
ओडिशात नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाशी (बीजेडी) भाजपची युती पूर्ण झालेली नाही. दोन्ही पक्षांच्या बैठकीत कोणताही अंतिम तोडगा न झाल्याने पक्षाने राज्यातील सर्व जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आता बीजेडी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकट्याने लढवणार आहे. बीजेडीसोबत युतीबाबत दिल्लीत झालेली बैठक अनिर्णित राहिली असतानाच हे वक्तव्य आले आहे. दोन्ही पक्ष एकमेकांच्या मागण्या मान्य करायला तयार नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल आपला दिल्ली दौरा संपवून ओडिशात परतले आहेत. सुरुवातीला भाजप आणि बीजेडीने युती करण्यास सहमती दर्शवली, परंतु दोघेही आता जागांमध्ये अधिक वाटा मागत आहेत. ओडिशातील 147 विधानसभेच्या जागांपैकी 100 पेक्षा जास्त जागा द्याव्यात अशी बीजेडीची मागणी आहे. बीजेडी 75 टक्के विधानसभा जागांची मागणी करत असून ही मागणी भाजपला मान्य नाही. बीजेडीने राज्यातील लोकसभेच्या 21 पैकी 14 जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी केली होती, जी भाजपने स्वीकारण्यास नकार दिला आहे.