तलाठ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच
विविध मागण्यांवर ठाम : महिला तलाठी लहानग्यांसह सहभागी : आंदोलनामुळे कार्यालये ओस
बेळगाव : तलाठ्यांवरील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करण्याबरोबरच सुविधा पुरवून वेतनवाढ करा, या मागणीसाठी तलाठी संघटनेच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सलग तिसऱ्या दिवशी बेळगावमध्ये तलाठी व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेळगाव जिल्ह्यातील तलाठ्यांनी आंदोलन करत जोवर मागण्या मान्य होणार नाहीत, तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.
शहरासोबत ग्रामीण भागात महसुलासंदर्भात महत्त्वाची कामगिरी तलाठी अधिकाऱ्यांवर असते. तलाठी पदावरील अधिकाऱ्यांना महसुलासंदर्भात एकूण 16 अॅपद्वारे मोबाईलवर काम करावे लागते. त्याचबरोबर पीकहानी सर्व्हे, अतिवृष्टीमुळे घरे कोसळल्यानंतरच्या सर्व्हेची जबाबदारी त्यांच्यावरच दिली जात आहे. जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असली तरी सुविधा मात्र देण्यात आलेल्या नाहीत. तलाठी अधिकाऱ्यांना स्वतंत्र कक्ष देण्यासोबतच चांगल्या दर्जाचा मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनरसह प्रवास भत्ता व वेतनवाढीची मागणी करण्यात आली आहे.
गुरुवारपासून या आंदोलनाला प्रारंभ झाला असून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. अद्याप राज्यस्तरावर आंदोलन सुरूच असल्याने सोमवारीही आंदोलन करण्यात आले. महिला तलाठ्यांनी आपल्या लहान मुलांना घेऊन आंदोलनाला उपस्थिती लावली होती. सलग तीन दिवस तलाठी आंदोलनात असल्यामुळे कार्यालये मात्र ओस पडली आहेत.