For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आक्रमक भाजपने विरोधकांना जवळ आणले

06:52 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आक्रमक भाजपने विरोधकांना जवळ आणले
Advertisement

क्रिकेट आणि राजकारण हे दोन्हीही फार बेभरवशाचे खेळ. कधी कसे वळण घेतात काही कळत नाही. अचानक चमत्कार झाल्याप्रमाणे खेळ पालटतो. ‘अब की बार, चारसो पार’ चा नारा देत विरोधकांना दमात उखडण्याचा भाजपचा आक्रमक डाव एकप्रकारे उलटा पडलेला दिसत आहे. सत्ताधाऱ्यांच्या या मुसंडी तंत्राने विरोधक बिचकून जायच्याऐवजी हळूहळू एक होऊ लागले आहेत. विरोधकांचा नामोनिशाणाच आपण मिटवला आहे अशा तोऱ्यात सत्ताधारी होते. आता इंडिया आघाडीने उसळी मारून 2024 ही गेल्या निवडणुकीसारखी भाजपला अजिबात सोपी नाही असेच संकेत दिले आहेत. गंमत अशी की पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच विरोधकांना जवळ आणले आहे.

Advertisement

अजूनही भाजप येत्या लोकसभा निवडणुकीतील ‘नंबर एक’ चा पक्ष आहे हे निर्विवाद. पण अयोध्येतील राम मंदिर, समान नागरी कायदा, विरोधकांना दडपण्याचे ‘बुलडोझर’ तंत्र, तुफानी प्रचार यंत्रणा, आणि ‘लोकोत्तर नेता’ अशी प्रतिमानिर्मिती  या सर्वांच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा मोदींचा डाव कितपत काम करणार यावर उलटसुलट चर्चा आहे. नितीश कुमार आणि जयंत चौधरी अशा दलबदलू नेत्यांचा खुबीने वापर करून इंडिया आघाडी निवडणुकीपूर्वीच संपली कशी असे चित्र रंगवण्यात भाजप यशस्वी ठरली होती. पण एक चमत्कारच जणू घडला आहे. काल परवापर्यंत एकमेकांच्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या विरोधी पक्षांनी खरा बागुलबुवा कोण आहे हे ओळखले आहे. मोदी-शहा यांची तिसरी टर्म आली तर आपल्यावर वरवंटा फिरेल या भीतीने ते जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे एक होत आहेत. इंडेक्स ऑफ ओप्पोझिशन युनिटी (विरोधी पक्षांच्या ऐक्याचा निर्देशांक) वाढू लागला आहे हे भाजप समर्थकपण काहीअंशी मान्य करत आहेत. प्रसारमाध्यमांवर भाजपचा जबर पगडा असल्याने वास्तव लोकांच्या समोर येत नाही इतकेच.

Advertisement

उत्तरप्रदेशात 80 पैकी 80 जागा जिंकण्याचे मनसुबे बांधणाऱ्या भाजपला तिथे समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने युती करून एक झटका दिलेला आहे. या युतीचा अर्थ असा की या राज्यातील सामना आता पूर्णपणे एकतर्फी राहणार नाही. आजघडीला भाजपला तिथे किमान 60-65 जागा मिळतील असा अंदाज आहे. या युतीमुळे एकप्रकारे विरोधकांच्या जीवात जीव आला आहे. जर भाजपच्या बालेकिल्ल्यात आपण सुरुंग लावू शकलो तर मग आपण काहीही करू शकतो अशी वेडी आशा त्यांच्या मनात आली आहे. ती कितपत खरी अथवा खोटी ते येणारा काळच दाखवेल. बसपाच्या मायावतींना ईडीचा धाक दाखवून भाजपने एकटे लढणे भाग पाडले. काँग्रेसला 17 जागा सोडून अखिलेश यांनी राहुल गांधींच्या यात्रेने उत्तरेतील वातावरणदेखील ढवळले गेलेले आहे असेच एक प्रकारे मान्य केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनादेखील उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा विचार आहे. मायावतींच्या राज्यात एका दलित नेत्याला रिंगणात उतरवून काँग्रेस आपली गेलेली मतपेढी आणायचा प्रयत्न करत आहे.

दिल्लीसह आसाम, हरियाणा, गोवा, गुजरात अशा तीन-चार राज्यात आम आदमी पक्षाबरोबर निवडणूक समझोता होऊ घातला आहे तर बंगालमध्ये ममता बॅनर्जी 42 पैकी किमान 5 जागा काँग्रेसकरता सोडणार आहेत असे दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही क्षणी तुरुंगाची हवा दाखवली जाईल या धास्तीने आप काँग्रेसचा मित्र बनला आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद काँग्रेसला झुकते माप द्यायला तयार आहेत. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकूनदेखील गैरभाजप पक्ष खंबीरपणे एक राहिले आहेत. द्रमुकबरोबर निवडणूक समझोता होणारच आहे. महाराष्ट्रातील जागावाटप अंतिम टप्प्यावर आले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सबरोबर बोलणी सुरु आहे. याचा अर्थ जवळजवळ नऊ-दहा राज्यात प्रामुख्याने एकास एक मुकाबला होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपने वेगळे लढायचे ठरवले आहे ते भाजपला अडचणीचे आहे.

थोडक्यात काय तर गेल्या महिन्यात खूप सारे धक्के सोसल्यावर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचे दुर्दैवाचे दशावतार आता संपलेले आहेत. याचा अर्थ गैरभाजप पक्षांची बल्ले बल्ले झाली असा नव्हे. पण अचानक उभारी घेऊन या आघाडीने पंतप्रधानांना चकित केले आहे. भाजपचे आडाखे चुकत आहेत. इलेक्टोरल बॉण्ड तसेच चंदिगड महापौर निवडणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उडवलेले ताशेरे सरकार व भाजपला अडचणीत आणत आहेत. ‘मोदी हैं तो कुछ भी मुमकिन हैं’ ही भीती विरोधकांना जवळ आणत आहे. नुसत्या ऐक्याने काही होत नसते कारण जर लोकांना भावणारा असा समान नागरी कार्यक्रम जोपर्यंत इंडिया आघाडी समोर आणत नाही तोवर भाजपला खरा मुकाबला तो करू शकेल असे दिसत नाही. अशावेळी ‘मोदींविरोधी कोण?’ असा प्रचार भाजपकडून तीव्र होऊ शकतो व पंतप्रधान लोक कल्याणाचे काम करत आहेत व त्यांना खाली खेचण्यासाठीच हवशे, नवशे, गवशे एक झाले आहेत असा कांगावा केला जाईल.

मोदींच्या तोडीचा एकही नेता विरोधी पक्षांकडे नाही. त्याचवेळी तेजस्वी यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, एम के स्टालिन, सिद्धरामय्या, शिव कुमार, रेवंत रे•ाr, जितू पटवारी असे काही नवे व काही जुने जाणते नेते आहेत. शरद पवार व लालू प्रसाद यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन आहे. कोणाला आवडो अथवा नावडो पण राहुल गांधी हे प्रमुख मोदी विरोधक म्हणून उदयाला आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर ईडीसारख्या तपास संस्थांच्या विरोधकांवरील धाडी म्हणजे सत्ताधारी पक्षातील वाढती चलबिचलच जास्त दाखवत आहे. मोदी-शहा यांच्या जाचाला कंटाळून बरीच ज्येष्ठ मंडळी वेगळा विचार करण्याच्या मनस्थितीत आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या घोषणेचीच केवळ प्रतीक्षा करत आहेत असे गैरभाजप गोटातून सांगण्यात येत आहे. यात तथ्य किती अथवा कसे ते पुढील महिन्यात दिसणार आहे.

भाजपमध्ये सारे काही आलबेल आहे असे अजिबात नाही. तिथे सुरु झालेली खोगीरभरती म्हणजे भाजप ‘जुन्या काँग्रेसींचा पक्ष’ (काँग्रेस aत्ल्स्हग् पार्टी)  हळूहळू होऊ लागला आहे अशी टीका होत आहे. ती सारीच असत्य आहे असे नाही. अशोक चव्हाण यांना भाजपत दाखल केल्यावर दुसऱ्या दिवशी राज्यसभा देण्यात आली तेव्हा माधव भांडारी या भाजपच्या जुन्याजाणत्या नेत्याच्या मुलाने समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहिली. त्यात अर्ध शतक पक्षाकरता आपल्या बापाने खस्ता कशा खाल्ल्या आणि त्याला अजूनतरी मिळाले काय? असा हृदयद्रावक प्रश्न विचारला. ‘माझा बाप कधी बोलणार नाही, पण मी मुलगा म्हणून माझी वेदना बोलली पाहिजे’, असे सूचवून त्यांनी नव्या भाजपमध्ये देखील दिव्याखाली अंधारच आहे असे दाखवले आहे. असे हजारो-लाखो ‘माधव भांडारी’ भाजपमध्ये आहेत.  नवीन भाजपमधील हे ‘न्यू नॉर्मल’ भयानक आहे. सतरंज्या उचलणारे कोण आणि खुर्च्यांवर बसणारे कोण? याबाबत लोक गप्प बसतील पण कुजबुज ती होणारच. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात काँग्रेस युक्त भाजप बनू लागला आहे. असे झाले तर निष्ठावंत भाजपाईंच्या डोक्यावर नवीन लोक मिरे वाटतील.

या निवडणुकीत सत्ताधारी आघाडी एकूण चारशेच्या पार तर भाजप किमान 370 जागा जिंकेल असा दावा केला जात असताना प्रत्यक्षात भाजपला हे शिवधनुष्य तिसऱ्यांदा  पेलता येणार की नाही हा साहजिकच प्रश्न आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने 437 जागा लढवून 303 मध्ये विजयश्री खेचून आणली होती. तेव्हा  भाजपाला 37 टक्के मतदारांनी मत दिले होते. 543 सदस्यीय लोकसभेत सध्या बहुमताकरिता 272 खासदार निवडून आणावे लागतात. मोदी यांनी ही किमया 2014 पासून दोनदा केलेली आहे. जर 400 जागा सत्ताधारी आघाडीला जिंकल्याच्या आहेत तर उत्तरप्रदेशातील 80 पैकी 80 जागा जिंकणे क्रमप्राप्त आहे. पण तसे होईल असे सध्या तरी दूरदूर दिसत नाही. थोडक्यात काय तर निवडणूक ही निष्पक्ष पद्धतीने झाली तर 2024 चे गणित कोणालाच सोपे नाही.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.