आरटीओ कार्यालयाला एजंटराजचे ग्रहण
नव्या इमारतीतही शिरकाव : आमदारांच्या आदेशाला हरताळ
बेळगाव : बेळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. कार्यालयाला नवीन सुसज्ज इमारत मिळाली, परंतु येथील एजंटराज मात्र काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांना एखाद्या कागदपत्रासाठी खस्ता खाव्या लागत असताना तेच काम एजंटामार्फत चुटकीसरशी होत असल्याने याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संगोळ्ळी रायण्णा सर्कल येथे सहा महिन्यांपूर्वी सुसज्ज असे प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय उभे राहिले. या ठिकाणी एजंटराज चालणार नाही, असे उद्घाटनादिवशीच अधिकाऱ्यांनी ठासून सांगितले. परंतु, सध्या मात्र कार्यालयात सर्वत्र एजंटांचाच वावर दिसत आहे. नागरिकांना वाहनपरवाना, नूतनीकरण, वाहनाचे पासिंग, जुने वाहन नावावर करणे यासह इतर कामांसाठी ये-जा करावी लागते.
परंतु, एजंटांकरवी हे करून घेतले तरच काम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एखादी सर्वसामान्य व्यक्ती वाहनपरवाना काढण्यासाठी गेली तर त्याला या खिडकीतून त्या खिडकीत धाडले जाते. एजंट आणि कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्यामुळेच हे प्रकार सुरू आहेत. सर्वसामान्यांचे काम होत नसल्याने त्यांना पुन्हा एजंटांकडेच जावे लागत आहे. त्यावेळी अधिकचे पैसे खर्च करून काम करून घ्यावे लागत आहे. नागरिकांना कागदपत्रांची पूर्तता नाही, सर्व्हर डाऊन आहे, संबंधित अधिकारी नाही, अशी कारणे देत माघारी पाठवले जाते. त्यामुळे याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
चिरीमिरीसाठी अडवणूक
केवळ आरटीओ कार्यालयातच नव्हे तर कलखांब येथील टेस्ट ड्राईव्ह व ऑटोनगर येथील पासिंग सेंटर येथेही चिरीमिरीसाठी नागरिकांची अडवणूक सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी तर आपले पंटर तयार केले असून त्यांच्यामार्फत अशा पद्धतीची कामे केली जात आहेत. याचा प्रत्येकाला अनुभव येत असल्याने आता बेळगावला सक्षम अधिकारी देण्याची मागणी केली जात आहे.
मंत्र्यांकडून कानउघाडणी
आरटीओ कार्यालयाच्या उद्घाटनादिवशीच महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी एजंटराज विरोधात अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. आरटीओ कार्यालयातील एजंटराज संपवून सर्वसामान्यांना प्राधान्य द्या, असे आदेश त्यांनी दिले होते. परंतु, सध्या सर्वत्र एजंटराज सुरू असल्याने आता मंत्रीमहोदयांनीच या प्रकरणामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे.