अगसगे ग्रा. पं.मधील भ्रष्टाचाराची चौकशी करून पीडीओ-अभियंत्यावर कारवाई करा
जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांना दलित प्रगतीपर सेनेचे निवेदन
वार्ताहर /अगसगे
अगसगे ग्राम पंचायतीमध्ये उद्योग खात्री योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी करावी व संबंधीत ग्राम विकास अधिकारी आणि अभियंत्यावर योग्य ती कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांना देण्यात आले आहे. दलित प्रगतीपर सेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवपुत्र मेत्री यांनी बुधवार दि. 10 रोजी निवेदन दिले व ग्राम पंचायतीमध्ये कोणत्या प्रकारे उद्योग खात्री योजनेमध्ये भ्रष्टाचार करीत आहेत. याची माहिती हर्षल भोयर यांना दिली. गणपती मंदिर ते तलावापर्यंत उद्योग खात्री योजनेमध्ये सुमारे 24 लाख रुपये खर्चून रस्ता करण्यात आला आहे. मात्र हे काम उद्योग खात्रीच्या कामगारांकडून न करता संपूर्णपणे शंभरच्या शंभर टक्के मशिनद्वारे करण्यात आले आहे. यासंबंधी दि. 29-11-2023 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये पीडीओ एन. ए. मुजावर, उद्योग खात्रीचे इंजिनियर रूद्राप्पा बशेट्टी आणि नोडल अधिकारी यांनी शंभर टक्के मशिनद्वारे कामे करता येतात, असे उत्तर ग्रामस्थांना दिले आहे. याचा व्हिडीओ व संबंधीत पुरावे आपल्याकडे आहेत. सकाळी उद्योग खात्री योजनेच्या लोकांना थांबवून फोटो काढण्यात आला आहे.
यासंबंधी दि. 15-4-2023 रोजी सतत आठ दिवस कामाच्यावेळी भेट दिली असता एकही उद्योग खात्री योजनेचा कामगार (मजूर) दिसला नाही. मात्र हजेरी बुकामध्ये त्या दिवसांचे मंजुरीचे पैसे त्यांच्या खात्याला घालण्यात आले आहेत. त्यावेळच्या कामाचा संपूर्ण व्हिडीओ व फोटो तारखेसह आपल्याकडे आहेत. तरी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी या कामाची त्वरित चौकशी करावी. आणि संबंधीत ग्रामविकास अधिकारी एन. ए. मुजावर व उद्योग खात्री योजनेचे अभियंता रूद्राप्पा बशेट्टी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी. या दोघांना निलंबित करावे आणि भ्रष्टाचार झालेला निधी या दोघांकडून वसूल करून सरकारला परत भरण्याचा आदेश बजावावा, असे निवेदनामध्ये म्हटले आहे. यावेळी दलित प्रगतीपर सेनेचे राज्याध्यक्ष शिवपुत्र मेत्री, सेफ वॉर्ड समुहाचे अध्यक्ष संतोष मेत्री, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोक कोलकार आदी उपस्थित होते.