For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आगरवाडेकर घर प्रकरण ‘सीआयडी’कडे

12:53 PM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
आगरवाडेकर घर प्रकरण ‘सीआयडी’कडे
Advertisement

घर बांधून देण्याची प्रक्रिया सुरु: साबांखात्यातर्फे घराची मोजमापणी

Advertisement

पणजी, म्हापसा : आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्याच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला असून घराच्या बांधकामाचे सर्वेक्षणही सुरू झाले आहे. याप्रकरणी मुख्य सचिव चौकशी करून अहवाल सादर करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.प्रदीप आगरवाडेकर यांचे राहते घर पूजा शर्मा नामक महिलेने बाउन्सर्सच्या मदतीने पाडण्याच्या घटनेने राज्यात खळबळ माजली आहे. त्याचबरोबर आगरवाडेकर पिता-पुत्राचे अपहरणही करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप झाला होता.

या प्रकरणात सरकारने गांभीर्याने लक्ष घातले आहे. मंगळवारी दिल्लीहून दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आसगावमध्ये जाऊन घटनेची पाहणी केली होती. त्यानंतर आता हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्री प्रदीप आगरवाडेकर यांच्या आसगाव निवासस्थानी भेट देऊन पाडलेले घर पुन्हा उभारून देईल, असे आश्वासन दिल्यानंतर काल बुधवारी साबांखाचे कार्यकारी अभियंता नाडकर्णी तसेचकनिष्ठ अभियंत्यांनी जमिनदोस्त करण्यात आलेल्या घराची मोजमापणी करून अहवाल तयार केला. शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, आसगाव सरपंच हनुमंत नाईक, आगरवाडेकर कुटुंबाच्या प्रिन्सा आगरवाडेकर यावेळी उपस्थित होत्या.

Advertisement

मुख्यमंत्र्यांचे आभार : डिलायला

डिलायला लोबो म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी घराची मोजमापणी केली आहे, ते याबाबतचा सर्व अहवाल मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत, असे सांगून लोबो यांनी याकामी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. सरपंच हनुमंत नाईक म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सांगितल्याप्रमाणे आज येथे अभियंतावर्ग घराची तपासणी करण्यासाठी दाखल झाले. ज्या दिवशी पूजा शर्मा हिला पोलीस अटक करणार त्या दिवशी आगरवाडेकर कुटुंबियांचा राग कमी होईल.

पत्रकार नसते तर...

पत्रकार नसते तर आपले घर संपूर्णपणे जमिनदोस्त झाले असते. पत्रकार साईप्रसाद प्रकाश कुबडे, वीणा मांद्रेकर यांनी घर मोडतोड करीत असल्याची माहिती योग्यवेळी आपल्यास पोलीस स्थानकात फोनवरून दिल्याने आपले घर थोड्याप्रमाणात वाचले असल्याची माहिती मालक प्रिन्सा आगरवाडेकर यांनी दिली.

आगरवाडेकर कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य : श्रीपादभाऊ

केंद्रीय उर्जामंत्री श्रीपाद नाईक यांनी आसगाव येथील आगरवाडेकर घर जमिनदोस्तप्रकरणी आगरवडेकर कुटुबीयांशी फोनवरून संपर्क साधून आपले सर्वतोपरी सहकार्य असल्याची ग्वाही दिली. संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने ते सध्या दिल्लीत आहेत. आगरवाडेकर कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी ठोस पावले उचलली असून संकटग्रस्त आगरवाडेकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कुठलीही कसर बाकी ठेवणार नाही, याबद्दल आपणास ठाम विश्वास आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही, तर गुंडांना हाताशी धरून बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याची आहे, असेही नाईक म्हणाले.

Advertisement
Tags :

.