महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्री ठाणेदार यांचा पुन्हा विजय

06:56 AM Nov 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेच्या मिचिगन प्रांतातून प्रतिनिधीगृहात सलग दुसऱ्यांदा संधी

Advertisement

वृत्तसंस्था / मिचिगन

Advertisement

बेळगावचे सुपुत्र असणारे आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेले श्री ठाणेदार यांच्या अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय झाला आहे. अमेरिकेतील मिचिगन प्रांताच्या 13 व्या जिल्ह्यातून ते डेमॉव्रेटिक पक्षाचे उमेदवार म्हणून यशस्वी झाले आहेत. त्यांनी त्यांचे रिपब्लिकन पक्षाचे प्रतिस्पर्धी मार्टेल बिविंग्ज यांचा 35 टक्क्यांपेक्षा अधिक मतांचे अंतर राखून मोठा विजय मिळविला आहे. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहात ते आता दुसऱ्यांना खासदार म्हणून कार्यरत होणार आहेत. त्यांच्या या महत्वपूर्ण यशामुळे बेळगाव परिसरात त्यांची प्रशंसा होत आहे. त्यांचा जन्म बेळगाव शहरातील शहापूर येथे झाला होता.

श्री ठाणेदार यांची एक कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून ख्याती आहे. आपल्या विजयाचे श्रेय त्यांनी आपल्या मतदारांना दिले. आपल्या मतदारसंघात भारतीय वंशाचे मतदार अत्यल्प आहेत. तरीही सतत मतदारांशी संपर्क, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा अथक प्रयत्न करणे, मतदारांना आधारभूत सेवा प्रदान करणे, कर्मचारी आणि कामकरी परिवारांचे प्रश्न हिरीरीने प्रतिनिधीगृहात मांडणे, त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे, कामगार आणि निम्नउत्पन्न गटातील लोकांच्या बाजूने उभे राहणे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहचविणे, इत्यादी महत्वाची कार्ये सातत्याने केल्याने मी मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा प्राप्त करु शकलो, अशी प्रतिक्रिया श्री ठाणेदार यांनी त्यांच्या मोठ्या विजयानंतर व्यक्त केली आहे.

नेहमी गजबजलेले कार्यालय

आपल्या जनसंपर्कासंबंधी माहिती ठाणेदार यांनी दिली. मी जेथे जातो, तेथे सर्वसमान्य लोक माझ्याकडे येतात. मी नेहमी त्यांच्यात मिसळतो. माझ्या कामासंबंधी ते समाधान व्यक्त करतात. मतदारांच्या व्हिसासंबंधीच्या समस्या, निवृत्त सैनिकांना मिळणाऱ्या लाभासंबंधीची कामे, प्राप्तीकर विवरणपत्र सादर करण्यात लोकांना साहाय्य करणे इत्यादी लोकोपयोगी कामे माझ्या कार्यालयात केली जातात. त्यामुळे माझे कार्यालय नेहमी गजबजलेले असते. माझा जनसंपर्क हेच माझे महत्वाचे राजकीय भांडवल आहे, असेही प्रतिपादन ठाणेदार यांनी केले आहे.

विरोधकांचाही सन्मान

या निवडणुकीच्या लोकतांत्रिक प्रक्रियेत भाग घेण्यासाठी मी माझ्या विरोधकांचे अभिनंदन करतो. मला निवडणुकीत सलग दुसरी संधी देण्यासाठी मी माझ्या डेमॉव्रेटिक पक्षाचाही आभारी आहे. ज्या कामगार संघटना आणि समूहांनी मला प्रचारकार्यात साहाय्य केले आणि मला भरभरुन मते दिली, त्यांचाही मी मन:पूर्वक आभारी आहे. मी नेहमीच माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी संघर्ष करण्यास सज्ज राहीन, अशी ग्वाहीही श्री ठाणेदार यांनी आपल्या वक्तव्यात दिली आहे.

तरुण भारतशी जवळचे संबंध

बेळगाव शहरातील शहापूर येथे जन्मलेले श्री ठाणेदार यांचे विज्ञान क्षेत्रातील पदवीपर्यंतचे शिक्षण बेळगावातच झाले आहे. काहीकाळ त्यांनी मुंबई येथे नोकरी केली होती. नंतर 1979 मध्ये त्यांनी अमेरिकेत स्थानांतर केले. अमेरिकेत त्यांनी रासायनिक पदार्थांच्या उत्पादन आणि विक्री व्यवसायात मोठे यश मिळवून एक यशस्वी उद्योगपती म्हणून ख्याती प्राप्त केली. नंतर त्यांनी अमेरिकेच्या समाजकारण आणि राजकारणात प्रवेश करुन तेथेही आपला ठसा उमटविला आहे. तरुण भारतशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्यांची विस्तृत मुलाखतही तरुण भारतने काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केली होती. अमेरिकेतील निवडणुकीत त्यांच्या सलग दुसऱ्यांदा झालेल्या विजयाचा आनंद बेळगावच्या नागरीकांना झाला असून त्यांनी अशाच प्रकारे उत्तरोत्तर यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article