For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेबैल टोलनाक्यावर पुन्हा 3 रोजी रास्ता रोको

11:22 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेबैल टोलनाक्यावर पुन्हा 3 रोजी रास्ता रोको
Advertisement

सूचना करुनदेखील कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याने घेतला निर्णय

Advertisement

खानापूर : खानापूर-बेळगाव महामार्गावरील गणेबैल येथील टोलनाका व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्याकडून गेल्या वर्षभरापासून मनमानी आणि उद्धटपणाची वागणून सर्व प्रवशांना देण्यात येत आहे. याबाबत वेळोवेळी सूचना करुनदेखील कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. रस्त्याचे काम अर्धवट असताना टोल आकारणी गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अद्याप देण्यात आलेली नसताना टोल आकारणी सुरू आहे. याबाबत गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्यावतीने गणेबैल येथील टोल नाक्यावर रास्ता रोको करणार असल्याचे के. पी. पाटील यांनी टोलनाका येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बेळगाव-गोवा महामार्गावर खानापूर तालुक्यातील गणेबैल येथे गेल्या मे महिन्यापासून वाहनाकडून टोल आकारणी सुरू करण्यात आली आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी जून 2023 मध्ये अनेकवेळा टोलनाका येथे आंदोलन केले होते. आंदोलनाच्यावेळी जिल्हाधिकाऱ्यानी तसेच आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत खानापूर येथील विश्रामधामात शेतकऱ्यासंमवेत बैठक घेऊन शेतकऱ्यांची शेत जमिनीची नुकसानभरपाई अवघ्या आठ दिवसात देणार असल्याचे जाहीर करून टोलनाका सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला होता. मात्र गेल्या दीड वर्षापासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. शेतकरी आजही नुकसानभरपाईसाठी जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. तसेच रस्त्याचे काम अद्याप अर्धवट असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावर टोल आकारणी सुरू केली आहे.

Advertisement

गणेबैल टोल नाक्यावरील व्यवस्थापक, कर्मचारी प्रवाशांसह  स्थानिक नागरिकांबरोबर उद्धट अन् मनमानी करत आहेत. तांत्रिक अडचण आल्यावरही प्रवाशांच्या गाड्या अर्धा तास अडवून उद्धटपणाची भाषा वापरण्यात येते. याबाबत दीडवर्षात अनेकवेळा  वादावादीचे प्रसंग घडले आहेत. कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असाच अनुभव शिवसेना राज्य उपप्रमुख के. पी. पाटील यांनाही आला आहे. याबाबत त्यांनी आपले वाहन टोल नाक्यावरच ठेवून खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी टोलनाका येथे पत्रकारांसमवेत बातचीत करून गुरुवार दि. 3 रोजी तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्यावतीने टोलनाका विरोधात रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी या ठिकाणी शेकडो नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.