चीनकडून पुन्हा आगळीक, भारताकडून प्रत्युत्तर
अरुणाचलवर पुन्हा केला दावा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर घेतला आक्षेप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने आक्षेप दर्शविला आहे. पंतप्रधान मोदींनी अरुणाचल प्रदेशात 13 हजार फुटांच्या उंचीवर निर्माण करण्यात आलेल्या सेला बोगद्याचे अनावरण केले होते. अरुणाच प्रदेश आमचा हिस्सा असून भारताच्या या पावलामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव वाढणार असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले आहे. तर भारताने अरुणाचल प्रदेश आमचे होते आणि कायम राहणार असल्याचे चीनला सुनावले आहे.
अरुणाचल प्रदेशचे नाव जांगजान असून तो चिनी क्षेत्र असल्याचे वक्तव्य वांग यांनी केले आहे. चीनने कधीच अवैध पद्धतीने वसविण्यात आलेल्या अरुणाचलप्रदेशला मान्यता दिलेली नाही. आम्ही आजही याचा विरोध करतो हा चीनचा हिस्सा असून भारत मनमानीपणे येथे काहीही करू शकत नसल्याचा दावा वांग यांनी केला आहे. भारताच्या या कृतीमुळे सीमेवरून दोन्ही देशांमधील वाद आणखी वाढू शकतो. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला आमचा विरोध आहे. याप्रकरणी भारताकडे आम्ही विरोध नोंदविला असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
भारताची ठाम भूमिका
चीनच्या वक्तव्यावर भारताच्या विदेश मंत्रालयाने प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी हे वेळोवेळी राज्यांचा दौरा करत असतात. अशाप्रकारच्या दौऱ्यांना आणि विकासकामांना विरोध केला जाऊ शकत नाही. अरुणाचलप्रदेश नेहमीच भारताचा हिस्सा होते आणि कायम राहणार आहे. आम्ही चीनसमोर ही भूमिका अनेकदा मांडली असल्याचे भारताच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जयसवाल यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदींकडून बोगद्याचे उद्घाटन
पंतप्रधान मोदींनी 9 मार्च रोजी अरुणाचलप्रदेशच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यातील बैसाखीमध्ये सेला बोगद्याचे उद्घाटन केले होते. हा बोगदा 13 हजार फुटांच्या उंचीवर निर्मित सर्वात लांब दुहेरी मार्ग असलेला बोगदा आहे. चीन सीमेनजीक निर्माण करण्यात आलेल्या या बोगद्याची लांबी 1.5 किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पामुळे चीन सीमेला लागून असलेल्या तवांगकरता पूर्णवेळ रस्ते संपर्क व्यवस्था प्रस्थापित झाली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक असल्याने हा बोगदा सैन्याच्या हालचालींना वेग प्रदान करणार आहे. हा बोगदा निर्माण झाल्याने चीन सीमेपर्यंतचे प्रवासाचे अंतर 10 किलोमीटरने कमी झाले आहे.
बीआरओकडून निर्मिती
हा बोगदा आसामच्या तेजपूर आणि अरुणाचल प्रदेशच्या तवांगला थेट जोडणार आहे. दोन्ही ठिकाणी सैन्याचे कोअर मुख्यालय असून यामुळे त्यांच्यातील प्रवासाचा कालावधी एक तासाने कमी होणार आहे. या पूर्ण बोगद्याचे डिझाइन आणि इन्फ्रास्ट्रक्चर भारतीय सैन्याच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) तयार केले आहे. या बोगद्यामुळे भारतीय सैन्याच्या सामर्थ्यात भर पडली असून चीनचे टेन्शन वाढले आहे.
सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण
सेला बोगदा सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सेला खिंडीनजीक तयार करण्यात आला आहे. हा भाग चिनी सैन्याला एलएसीवरून स्पष्टपणे दिसतो. 1962 च्या युद्धात चिनी सैन्याने सेला खिंडीतून शिरून तवांगपर्यंत कूच केली होती. तवांग सेक्टरमध्येच 9 डिसेंबर 2022 रोजी चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती, ज्यानंतर भारतीय सैनिकांसोबत त्यांची झटापट झाली होती.