धक्क्यांमागून धक्के, मदतीचा ओघ 24 तासांत 11 वेळा म्यानमार हादरला,
भूकंपात हजारहून अधिक बळी, 2,400 जखमी : गेल्या 200 वर्षांतील हा सर्वात मोठा प्रलयंकारी भूकंप
वृत्तसंस्था/ बँकॉक, नायपिडॉ
म्यानमारमध्ये शुक्रवारी 7.7 तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपानंतर अधून-मधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, शुक्रवारी रात्री 11:56 वाजता म्यानमारमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. तसेच शनिवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.1 इतकी मोजली गेली. त्यानंतरही हादऱ्यांचे सत्र सुरू असून गेल्या चोवीस तासात 11 वेळा भूकंपाची नोंद झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी वित्त आणि जीवितहानी झाली असून मृतांचा आकडा हजारांवर पोहोचला आहे. या आपत्तीतून सावरण्यासाठी भूकंपग्रस्त देशांना भारतासह अनेक देशांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
म्यानमारमध्ये गननचुंबी इमारती, घरे, बौद्ध स्तूप, मंदिरे, रस्ते आणि पूल मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहेत. दोन दिवसांत 5 रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे तीन भूकंप झाले आहेत. शुक्रवारी झालेल्या 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. दुसरीकडे, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक 30 मजली इमारत कोसळली आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. म्यानमार आणि थायलंडमध्ये गेल्या 200 वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे म्यानमारच्या 6 राज्यांमध्ये आणि संपूर्ण थायलंडमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा जास्त असू शकतो, अशी भीती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने व्यक्त केली आहे. भूकंपाचे धक्के थायलंड, बांगलादेश, चीन आणि भारतापर्यंत जाणवले.
येथे नवीनतम भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाल्यामुळे आफ्टरशॉकची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भूकंपामुळे तिथे मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. स्थानिक माध्यमांनुसार, आतापर्यंत 1,002 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 2,400 लोक जखमी झाले आहेत. पहिल्यांदाच, म्यानमारच्या लष्करी सरकारने भूकंप मदतकार्यासाठी जगभरातून मदतीचे आवाहन केले आहे. 2021 पासून सत्तेत असलेल्या लष्करी सरकारच्या काळात येथे 6.2 आणि 6.4 तीव्रतेचे मोठे भूकंप झाले आहेत.
म्यानमारमध्ये पुन्हा वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या धक्क्यांमुळे अनेक भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचे केंद्र राजधानी नायपिडॉजवळ असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी पहाटे 5:16 वाजता अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. जमिनीपासून 180 किमी खोलीवर झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी होती. येथे आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपाच्या एका दिवसानंतर हा भूकंप आला आहे.
बँकॉकमध्ये 2000 हून अधिक इमारतींचे नुकसान
बँकॉकमध्ये आतापर्यंत 2000 हून अधिक इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त मिळाले आहे. येथील मदतकार्यासाठी 100 हून अधिक अभियंते तैनात करण्यात आले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, हा गेल्या 200 वर्षात देशात आलेला सर्वात मोठा भूकंप आहे. भूकंपाचे धक्के इतके शक्तिशाली होते की भूकंपाच्या केंद्रापासून शेकडो किलोमीटर अंतरावर बँकॉकमधील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
अनेक देशांकडून मदतीचा हात...
► भूकंपानंतर भारताने 15 टन मदत साहित्य आणि 80 एनडीआरएफ बचाव कर्मचाऱ्यांची टीम म्यानमारला पाठवली.
► संयुक्त राष्ट्रांनी म्यानमारला मदत कार्यक्रम सुरू करण्यासाठी 5 दशलक्ष डॉलर्स (43 कोटी रुपये) मदत पाठविली.
► रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने 120 बचाव कर्मचारी आणि आवश्यक साहित्य घेऊन दोन विमाने पाठवली.
► अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही म्यानमारला मदत जाहीर केली. ही मदत लवकरच पोहोचणार आहे.
► चिनी बचाव पथकही म्यानमारमध्ये दाखल झाले. हाँगकाँग, सिंगापूर आणि मलेशिया देखील बचाव पथके पाठवणार.
► दक्षिण कोरिया आंतरराष्ट्रीय मानवी संघटनेमार्फत 20 लाख डॉलर्स (सुमारे 16.5 कोटी रुपये) मदत करणार.
► मलेशिया सरकारने म्यानमारमध्ये बचावकार्य करण्यासाठी प्रत्येकी 25 जणांची दोन पथके पाठवली आहेत.