For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाद्वार रोडवर दुपारनंतर साऊंड सिस्टीमचा दणदणाट

05:18 PM Sep 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
महाद्वार रोडवर दुपारनंतर साऊंड सिस्टीमचा दणदणाट
Advertisement

पाटाकडील तालीम मंडळाने दुपारी साडेतीनच्या सुमारास केला प्रवेश; विसर्जन मिरवणुकीवर सायंकाळी शहरातील बड्या तालीम मंडळांचा कब्जा

कोल्हापूर प्रतिनिधी

गणेश विसर्जन मिरवणुकीत महाद्वार रोडवर दुपारनंतर साऊंड सिस्टीमचा दणदणाट सुरु झाला. पाटाकडील तालीम मंडळाने दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास महाद्वार रोडवर प्रवेश केला. यानंतर एकापोठापाठ एक साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात शहारातील तालीम मंडळे महाद्वारा रोडवर दाखल होत होत्या. सायंकाळी मित्र प्रेम मंडळाचा अपवाद वगळता साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात बड्या तालीम मंडळांनी मिरवणुक मार्गावर कब्जा केला.

Advertisement

कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील बहुतांश मोठया तालीम मंडळांनी यंदाही साऊंड सिस्टीम आणि आकर्षक विद्युत रोषणाईला पसंती दिली. रात्री उशिरा मंडळांनी साऊंड सिस्टीम स्ट्रक्चरसह विसर्जन मिवरणुक मार्गालगत येवून थांबले होते. सकाळच्या सत्रात पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीत काढणाऱ्या मंडळांना विसर्जन मिरवणुक मार्गावर प्रवेश दिला. यानंतर साऊंड सिस्टीम असलेल्या मंडळांना हळूहळू मिरवणुक मार्गावर येण्यास सुरुवात केली. मिरवणुक मार्गात महाद्वारा रोडवर प्रवेश करण्यास सगळ्यांच मंडळांची चढाओढ सुरु असते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाटाकडील तालीम मंडळांना महाद्वार रोडवर प्रवेश केला. त्यापोठापाठ मिरजकर तिकटीकडून बालगोपाल तालीम, दिलबहार तालीम, नंगीवली तालीम तर खरी कॉर्नरकडून खंडोबा तालीम, वेताळमाळ तालीम, शहाजी तरुण मंडळ, बीजीएम आदी मंडळांनी त्याचबरोबर ताराबाई रोड येथून बोर तालीम, दयावान, शिवाजी तालीम, वाघाची तालीम, हिंदवी स्पोर्ट्स, रंकाळा तालीम आदी मंडळांनी महाद्वार रोडवर प्रवेश केला.

दोन बेसची मर्यादा ओलांडली
विसर्जन मिरवणुकीत दोन बेस, दोन टॉपला लावले जात होते. मात्र यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक तालीम मंडळांनी हि मर्यादा ओलांडली. मंडळांनी चार ते सहा बेस चार टॉप लावल्याचे दिसून आले.

Advertisement

महिला, तरुणीही थिरकल्या
साऊंड सिस्टीमच्या दणदणाटावर मिवरणुकीत महिला, तरुणीही थिरकल्या. शहाजी वसाहत, दयावान, आव्हान स्पोर्ट्ससह अन्य काही मंडळांच्या मिवरणुकीत महिला, तरुणीही सहभागी झाल्या होत्या. साऊंड सिस्टीमवर वाजणाऱ्या गाण्यांवर ठेका धरत महिला, तरुणींही मिरवणुकीचा मनमुराद आनंद लुटला.

लेझर लाईटला फाटा
लेझर लाईटचे मानवी आरोग्यावर होणारे हानीकारक परिणाम लक्षात घेता आणि गणेश आगमन मिरवणुकीत झालेले इजा लक्षात घेता विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटच्या वापरावर पोलीस प्रशासनाने बंदी घालत, वापर केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पोलीस प्रशासनाला सहकार्य करत सर्वच तालीम, मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटला पूर्णपणे फाटा दिला.

Advertisement

.