कॅन्टोन्मेंट बसस्थानकातील दुकान गाळ्यांना मुहूर्त
दोन ते अडीच वर्षांनी दुकान गाळे सुरू : आता प्रवासी वाढण्याची गरज
बेळगाव : रेल्वे स्टेशनसमोरील कॅन्टोन्मेंट बसस्थानकातील दुकान गाळ्यांना अखेर दोन ते अडीच वर्षांनी मुहूर्त मिळाला आहे. 12 पैकी 3 दुकान गाळ्यांना बोली लावण्यात आली असून यापैकी एक दुकान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मागील पाच ते सहा वर्षांपासून बंद असलेले दुकान गाळे पुन्हा सुरू झाले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्थानकासमोर बसस्थानक उभारण्यात आले होते. या ठिकाणाहून बेळगावसह खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरू होती. त्याचबरोबर कारवार, गोवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बससेवा सुरू होती. स्मार्ट सिटी अंतर्गत या बसस्थानकाचा विकास करण्याचे निश्चित करण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अखत्यारित बसस्थानक असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डनेही परवानगी दिली. त्यामुळे 2 कोटी रुपये खर्च करून स्मार्ट बसस्थानक तयार करण्यात आले.
या बसस्थानकात 12 दुकान गाळे बांधण्यात आले. एकूण 67 चौरस फूट रुंद असणारे दुकान गाळे बांधून तयार असले तरी स्मार्ट सिटीकडून कॅन्टोन्मेंटकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया राबविण्यास विलंब झाला. त्यानंतर कॅन्टोन्मेंटने दुकान गाळ्यांसाठी भरमसाट भाडे निश्चित केल्याने कोणीच दुकान गाळे भाडेतत्त्वावर घेण्यास तयार नव्हते. सहा ते सातवेळा निविदा काढल्यानंतर अखेर कॅन्टोमेंटने दुकान गाळ्यांचे भाडे कमी केल्याने 12 पैकी 3 दुकान गाळ्यांना बोली लावण्यात आली. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या ठिकाणी दुकान गाळे सुरू झाले आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची होणारी गर्दी पाहता काही बसफेऱ्या कॅन्टोमेंट बसस्थानकात सुरू कराव्यात. प्रवाशांची संख्या वाढली तरच उर्वरित दुकान गाळेदेखील भाडेतत्त्वावर जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून बसस्थानकातील प्रवासी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे.