For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानसभेतील विजयानंतर 11 जणांनी सोडली खासदारकी

06:50 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
विधानसभेतील विजयानंतर 11 जणांनी सोडली खासदारकी
Advertisement

चार राज्यांत 21 भाजप खासदारांनी निवडणूक लढवली, पैकी 12 विजयी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण 21 खासदार उभे केले होते. त्यापैकी 12 खासदार निवडणुकीत विजयी झाले तर 9 पराभूत झाले. 12 विजयी खासदारांपैकी 11 खासदारांनी बुधवारी लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिला. केवळ राजस्थानमधून निवडणूक जिंकलेल्या बालकनाथ यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.

Advertisement

संसद सदस्यत्व सोडणाऱ्यांमध्ये नरेंद्र सिंग तोमर, प्रल्हाद सिंग पटेल, राकेश सिंग, उदय प्रताप आणि रिती पाठक हे मध्यप्रदेशातील आहेत. अऊण साओ, रेणुका सिंह आणि गोमती साई हे छत्तीसगडचे आहेत. तसेच राज्यवर्धनसिंह राठोड, दिया कुमारी आणि किरोरीलाल मीणा हे राजस्थानमधील आहेत.

राजस्थानमधून भाजपच्यावतीने सात खासदारांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये बाबा बालकनाथ, किरोडीलाल मीणा, दिया कुमारी, राज्यवर्धनसिंह राठोड, भगीरथ चौधरी, नरेंद्र खिचड आणि देवजी पटेल यांचा समावेश होता. या सातपैकी राज्यवर्धन, बालकनाथ, दिया कुमारी आणि किरोडीलाल या केवळ चार जणांना निवडणूक जिंकता आली. आता संसद सदस्यत्वाचा राजीनामा देत विधानसभेचे सदस्यत्व घेतलेल्या आमदारांना पक्ष मंत्रिपद देऊ शकतो. सध्या राजीनामा दिलेल्यांपैकी राज्यवर्धन सिंह राठोड हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. राजस्थानमधील बाबा बालकनाथ यांनी अद्याप लोकसभा अध्यक्षांकडे खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही. अशा स्थितीत ते एकतर आगामी काळात राजीनामा देतील. न दिल्यास आमदारपद सोडल्यानंतर तेथे पोटनिवडणूक होऊ शकते.

मध्यप्रदेशातील स्थिती

मध्यप्रदेशात फग्गन सिंग कुलस्ते, राकेश सिंग, उदय प्रताप सिंग, रिती पाठक, प्रल्हाद सिंग पटेल, गणेश सिंग आणि नरेंद्रसिंग तोमर यांच्यासह 7 खासदारांनी विधानसभा निवडणूक लढवली. यापैकी गणेश सिंग आणि कुलस्ते निवडणुकीत पराभूत झाले. अन्य खासदारांनी निवडणूक जिंकली. विजेत्या खासदारांपैकी नरेंद्रसिंग तोमर आणि प्रल्हाद सिंग पटेल हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. आता लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या उर्वरित आमदारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.

छत्तीसगडमध्ये तीन खासदार विजयी

छत्तीसगडमध्ये भाजपने विजय बघेल, गोमती राय, रेणुका सिंह आणि अऊण साओ या चार खासदारांना उमेदवारी दिली. यापैकी गोमती राय, रेणुका सिंह आणि अऊण साओ यांनी निवडणूक जिंकली. तर विजय बघेल यांचा पराभव झाला. आता खासदारपदाचा राजीनामा दिलेल्यांपैकी कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपद किंवा मंत्रीपदाची माळ पडते हे लवकरच समजणार आहे.

Advertisement
Tags :

.