वाघानंतर आता 20 माकडांचा मृत्यू
चामराजनगर जिल्ह्यातील घटना : सर्व माकडांनाही विषबाधा झाल्याचा संशय
बेंगळूर : चामराजनगर जिल्ह्यातील मलैमहादेश्वर वनोद्यानातील पाच वाघांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी चामराजनगर जिल्ह्याच्या गुंडलूपेट तालुक्यातील बंडीपूर व्याघ्र अभयारण्याच्या सीमेवर असलेल्या मेलकम्मनहळ्ळीजवळ 20 हून माकडे मृतावस्थेत आढळून आली आहे. वाघांप्रमाणे या सर्व माकडांचाही विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी 6.30 च्या सुमारास कोंडेगाल-कोडसोगे रस्त्यावर दोन पिशव्यांमध्ये मृत माकडे टाकण्यात आल्याचे वृत्त रस्त्यावरून जाणाऱ्यांनी दिले. याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जिवंत असलेल्या दोन माकडांना गुंडलूपेट तालुक्मयातील हंगळ येथील सरकारी पशुवैद्यकीय ऊग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. जाणूनबुजून विषबाधा झाल्याचा संशय असल्याने वन विभागाने बंडीपूर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या जागेची पाहणी करण्यासाठी श्वान पथक तैनात केले आहे. दरम्यान, वन, पर्यावरण आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांद्रे यांनी एमएम हिल्स वन्यजीव अभयारण्यात शिकाऱ्यांनी बिबट्याची शिकार केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.