For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निकालानंतर महायुतीत धुसफूस वाढणार

06:46 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
निकालानंतर महायुतीत धुसफूस वाढणार
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीतील पडद्यामागील घडामोडी समोर यायला सुरूवात झाली असून शिवसेना नेते गजानन कीर्तीकर आणि आनंदराव अडसूळ यांनी भाजपबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. आनंदराव अडसूळ यांनी भाजप नेते अमित शहा यांनी अमरावती लोकसभा निवडणूक न लढविण्यासाठी राज्यपालपदी वर्णी लावण्याचे आश्वासन दिल्याचे वक्तव्य केले आहे. तर शिंदे गटातील अनेक मौन धारण करणारे नेते हे निकालानंतर व्यक्त होण्याची शक्यता आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून भाजपविरोधात एकामागुन एक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकांचा राज्यातील शेवटचा टप्पा होतो न होतो, तोवर महायुतीतील नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे. मुंबईतील मतदानाच्या दिवशीच शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार बघता महाविकास आघाडीचे अधिक उमेदवार येतील अशी दिलेली प्रतिक्रिया खुप महत्त्वाची आहे. निवडणुका होईपर्यंत गप्प असलेले शिवसेनेचे नेते आता भाजपच्या विरोधात बोलू लागले आहेत. गजानन कीर्तीकर आणि आनंदराव अडसूळ हे शिवसेनेतील कामगार संघटनेच्या माध्यमातून पुढे आलेले नेते, स्थानीय लोकाधिकार समिती असो किंवा महाराष्ट्र राज्य को. ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन असो या संघटनांच्या माध्यमातून मराठी पांढरपेशा वर्गाला शिवसेनेकडे वळविण्याचे काम या नेत्यांनी केले. शिवसेनेत सहकार चळवळीच्या माध्यमातून राजकारण करणारा एकमेव नेता म्हणजे आनंदराव अडसूळ होय. 1990 पासून सतत कोणती ना कोणती निवडणूक लढविणारे अडसूळ आणि कीर्तीकर हे नेते मात्र यावेळी पहिल्यांदा निवडणूक रिंगणात नव्हते, शिवसेनेते फुट पडल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उध्दव ठाकरेंची साथ सोडली. मात्र साथ सोडल्याचा कुठेतरी पश्चाताप होत असल्याचे सध्या तरी त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. जसे पावशा पक्षाला पावसाचा अंदाज येतो तसाच अंदाज हा अनुभवी राजकीय नेत्यांना मतदान झाल्यानंतर येतो. राज्यात लोकसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे आणि शरद पवारांना जनतेची असलेली सहानुभुती, आघाडीने स्थानिक पातळीवर दिलेले उमेदवार बघता, जिथे जिथे भाजपविरोधात आघाडीने सक्षम पर्याय दिला आहे, तेथे भाजप डेंजरझोन मध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपने दिलेला 45 प्लसच्या नाऱ्याबाबत काय होणार हे चार जुनलाच कळेल. महायुती आणि महाविकास आघाडीत झालेल्या या लढतीत महायुतीतील पक्षांपेक्षा महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये स्थानिक पातळीवर चांगला समन्वय असल्याचे बघायला मिळाले. महायुतीत केबिनमध्ये वारेमाप महाचर्चा झाल्या, मात्र बाहेरचे चित्र वेगळे असल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे आता ही खदखद बाहेर पडायला सुरूवात झाली आहे. मावळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जर राष्ट्रवादीने आपले 100 टक्के काम केले असते तर आपण संजोग वाघिरे यांचे डिपॉझिट जप्त केले असते असा थेट आरोप राष्ट्रवादीवर केला तर बारामतीत जर सुनेत्रा पवार पडल्या तर चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य कारणीभूत असेल असे अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे भाजपसोबतचे मित्रपक्ष आता भाजपविरोधात बोलू लागले आहेत. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी तर थेट भाजप नेते अमित शहा यांनी आपल्याला अमरावती लोकसभा निवडणूक न लढविण्यासाठी राज्यपाल पदाचे आश्वासन दिल्याचे सांगितले. आता पडद्यामागे घडलेल्या घडामोडी, कमिटमेंट हळुहळु बाहेर येऊ लागल्या असून यात कोणकोणते मोठे गौप्यस्फोट होणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांनी तर मुख्यमंत्री शिंदे हे चक्रव्युहात फसल्याचे बोलताना लोकसभेलाच जर शिंदे गटाच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कापला जात असेल तर विधानसभेला काय करतील असे बोलताना भाजपवर जोरदार टीका केली. नवले यांनी किमान तीन पक्षातील 100 पेक्षा जास्त लोकांना विधानपरिषदेची आमदारकी देण्याचे आश्वासन दिल्याचे नवले यांनी सांगितले. आता आनंदराव अडसूळ यांनी राज्यपाल पदाबाबत दिलेल्या कमिटमेंटनंतर अनेक जण पडद्यामागच्या घडामोडी पडद्यापुढे आणण्याची शक्यता आहे. उध्दव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत दाखवलेला आक्रमकपणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना दिलेला आश्वासन यामुळे उध्दव ठाकरे यांच्या महाआघाडीतील नेतृत्वाबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. शिंदे गटातील खदखद आता व्यक्त होऊ लागली असून, ज्या शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना तिकीट नाकारण्यात आले, त्या कृपाल तुमाणे, भावना गवळी, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ यांच्यापैकी काही जण मतदान होईपर्यंत शांत होते, त्यातील अडसूळ आणि कीर्तीकरांनी आपले मौन सोडले असून, आता निकाल काय लागतो यानंतर मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील पदवीधर मतदार ठरवणार शिवसेना कोणाची

Advertisement

मुंबई शिक्षक आणि पदवीधर तसेच नाशिक आणि कोकण पदवीधर मतदार संघाची विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, लोकसभेप्रमाणेच उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या दोन उमेदवारांची घोषणा केली. ठाकरे गटाकडून मुंबई पदवीधरसाठी अॅड. अनिल परब तर शिक्षक मतदार संघासाठी ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. दिपक सावंत हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवार निवडुन येत आहे. भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर मुंबईतील ही पहिलीच पदवीधर निवडणूक होत असून भाजप कोणती भूमिका घेणार, शिंदे गटाला जागा सोडणार की भाजप उमेदवार देणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खरी शिवसेना कोणाची हे जरी मतदार ठरवणार असला तरी मुंबईतील सुशिक्षित मतदार पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने ही खरी शिवसेना कोणाची हे ठरवणार आहे.

प्रवीण काळे#

Advertisement
Tags :

.