आरक्षण सोडतीनंतर आता युती आघाड्यांची लगबग
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. एकीकडे आरक्षण जाहीर होत असतानाच दुसरीकडे राजकीय पक्षांच्या युती आणि आघाड्यांच्या चर्चांना आता सुरूवात झाली आहे. महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजपच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे, तर तिकडे महाविकास आघाडीत शिवसेना (उध्दव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि मनसे या प्रादेशिक पक्षांची आघाडी झाल्यास, भाजपप्रणीत महायुतीसमोर प्रादेशिक पक्षांची आघाडी असलेला एक सक्षम विरोधीपक्ष मिळणार आहे. या विरोधीपक्षाशी सामना करायचा असल्यास भाजपला देखील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी युती करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सोमवारी नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले, या आरक्षणानंतर लगेचच स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांना ऊत येणार आहे. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर अस्तित्व राहिले तरच, पक्षाचे अस्तित्व कायम ठेवता येते. पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या निवडणूका महत्त्वाच्या मानल्या जातात. राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद यांच्यासोबतच राज्यातील 27 महापालिकांच्या निवडणूका देखील महत्त्वाच्या आहेत. त्यात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिपरी-चिंचवड, नाशिक आणि नवी मुंबई या महापालिकांच्या निवडणूकांना राज्यातील 2022 ला झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विशेष महत्त्व यंदा आले आहे. शिवसेना फुटीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका झाल्या, या निवडणूकांच्या निकालानंतरही एक प्रश्न अनुत्तरीत आहे. तो म्हणजे खरी शिवसेना कोणाची आणि त्या प्रश्नाचे अचुक उत्तर हे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकांच्या निवडणूकांनंतर मिळणार आहे. या भागातील राजकीय समीकरणे ही ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर अवलंबून असणार आहे. रविवारी पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी दोन्ही भावांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकेबद्दल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकमत झाले असल्याचे सांगितले. राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपसोबतच शिवसेना शिंदे गटाचे टेन्शन वाढणार आहे. मुंबईचा महापौर मराठी होईल आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा, मराठी बाण्याचा होईल. दिल्लीचे जोडे उचलणारा कोणताही माणूस मुंबईचा महापौर होणार नसल्याचेही यावेळी राऊत म्हणाले. 2005 नंतर 2025 ला मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू हे आगामी निवडणूकांमध्ये देखील ठाकरे ब्रॅन्ड टिकवण्यासाठी एकत्र येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सुप्रिया सुळे, उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे हे तीन जण स्वत:च्या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, तीन्ही पक्षांना कोणाच्या आदेशाची गरज नाही. कार्यकर्त्यांच्या देखील नाही. ठाकरे आणि पवार यांचा राजकीय वारसा या तिघांना आहे, रविवारी एका सोहळ्याला हे तीनही नेते एकत्र होते. त्यामुळे शिवसेना-मनसे आणि राष्ट्रवादी यांची प्रादेशिक पक्षांची महाविकास आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथे शिवसेना आणि मनसेचे तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तर मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी नाशिक महापालिकेत मनसेची पहिली सत्ता आणली होती. त्यामुळे या तीनही पक्षाचे स्वत:चे असे बालेकिल्ले आहेत, स्वत:ची अशी बलस्थाने आहेत, त्यात दोन ठाकरे एकीकडे असल्याने शिवसेना शिंदे गटाकडून सांगण्यात येत असलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा हा आपोआप निकाली निघणार आहे.
त्यात दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून स्वबळाची भाषा केली जात आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी तर ठाण्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देताना ठाण्यात शिवसेनेसोबत युती न करता, स्वबळावर लढण्याचे वक्तव्य केले आहे. ठाणे आणि नवी मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होईल असा निर्धार देखील नाईक यांनी व्यक्त केला आहे तर दुसरीकडे एरव्ही जहाल भाषणांसाठी ओळखले जाणारे एकनाथ शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे आता भाजपसोबतच्या युतीसाठी मवाळ झाल्याचे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र न लढता, युतीतच लढावे, असे आवाहन त्यांनी भाजपला केले आहे. स्वबळावर लढल्यास कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे हवं तर तुम्ही 100 जागा लढा, आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे 50 जागा लढतो पण युती करा असं आवाहन शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला केलं. युती जर केली नाही तर कार्यकर्ते मऊन जातील असं निर्वाणीचे देखील पाटील म्हणाले, तर तिकडे अजित पवारांची ताकद असलेल्या पुण्यात राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे पुण्यात सर्व प्रभागात उमेदवार आहेत, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र 2014 नंतर भाजपने येथील राष्ट्रवादीच्याच नेत्यांना भाजपात घेत राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यात गिरीश बापटानंतर भाजपकडे सक्षम नेता नाही, तर, चंद्रकांत दादांना अजुनही पुणेकर कोथऊडचेच मानतात. 2029 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांमध्ये जर भाजपला स्वबळावर वर्चस्व मिळवायचे असेल तर, भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमधूनच आपली लिटमस टेस्ट करता येणार आहे. त्यामुळे भाजप स्वबळावर लढणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष ठाकरे-पवार-ठाकरे यांच्या प्रादेशिक पक्षांच्या आघाडीत सामिल होणार का? हा मोठा सवाल आहे. लोकसभेला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेटवर्कचा सर्वाधिक फायदा हा काँग्रेसला झाला, आता काँग्रेस कोणती भूमिका घेणार हे बघणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, प्रभागनिहाय उमेदवारासाठी तसेच नगराध्यक्ष, जि. प. अध्यक्ष आणि महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर होत असली तरी, आगामी काळात होणाऱ्या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील आघाडी आणि युतीच्या समीकरणांवरच अनेक उमेदवारांचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.
प्रवीण काळे