हरियाणा निकालानंतर
हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्यातील निवडणूक निकाल हाती आले तेव्हा महाराष्ट्रात ‘थोडी खुशी थोडा गम’ अशी अवस्था समोर आली. या दोन्ही राज्यांत मतमोजणीत भाजप कोसळणार आणि कॉंग्रेसची सरशी होणार असे अनेक मान्यवर पंडित व विविध सर्वे अनुमान काढत होते. या दोन्ही ठिकाणी भाजप पडणार आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होणार असे सांगितले जात होते. मतमोजणीचे प्रारंभीचे कल कॉंग्रेस की जय असेच होते पण मतमोजणीच्या पुढच्या फेऱ्या मोजायला सुरुवात झाली त्यानंतर मात्र चित्र बदलले. आता भाजपचे चाणक्य काश्मीर खोऱ्यावर आणि महाराष्ट्रावर नजर ठेवून आहेत. हरियाणात सलग तिसऱ्यांदा सत्ता राखताना आणि गैरसमज तसेच अफवा पसरवून खिसा मारण्याचे प्रयत्न हाणून पाडताना भाजपने जे कौशल्य दाखवले ते पाहता मतदार हुषार झाले आहेत, राजकारणी जात, धर्म, गट, याचा आधार घेत गैरसमज पसरवून जे उद्योग करतात त्याला दाद देत नाहीत आणि निवडणूक सर्वेक्षण वगैरे जे जाहीर होते ते खरे नसते आदी गोष्टी अधोरेखित झाल्या आहेत. या निवडणुकांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार असा सवाल विचारला जातो आहे. आणि तो लाखमोलाचा आहे कारण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दसरा होताच जाहीर होईल.
साहजिकच या निकालाचा मतदारांवर नसला तरी कार्यकर्त्यांवर निश्चित परिणाम होईल आणि महाराष्ट्रातील निवडणूक अधिक चुरशीची होईल अशी शक्यता दिसते आहे. हरियाणा निकालावर शिवसेना ठाकरे गटाची प्रतिक्रिया कॉंग्रेसला दुषण देणारी, जबाबदार ठरवणारी आहे. आणि त्याचा संबंध मोठा भाऊ व चेहरा यांच्याशी संबंधित आहे. पण काँग्रेस आणि कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील पुढारी अशा कोणत्याही टीका टिपणीला भीक घालतील अशी सूतराम शक्यता नाही. कॉंग्रेस नेत्यांनी ‘सांगली पॅटर्न’ हे नवे अस्त्र शोधून काढले आहे ते ठाकरी बळजोरीला व पवार शिरजोरीला उतारा ठरते. लोकसभा निवडणुकीत शक्ती नसताना शिवसेनेने सांगलीची जागा हिसकावून घेतली. एकतर्फी उमेदवार जाहीर केला तेव्हा कॉंग्रेसजन एकत्र आले व त्यांनी विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून उभे केले व निवडून आणले. आता विधानसभा निवडणुकीत तोच सांगली पॅटर्न राज्यात पाच पंचवीस जागी दिसला तर आश्चर्य वाटू नये. महायुती आणि महाआघाडी यांच्यातील जागावाटप बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. महायुतीत दोनशे जागांचे तर महाआघाडीत दिडशे जागांचे वाटप पक्के मानले जाते आहे. महायुतीत 45 जागा अजितदादांना 80 जागा एकनाथ शिंदे यांना व उर्वरित जागा भाजपाला असे सुत्र दिसते आहे. अजितदादांची तळ्यात मळ्यात वक्तव्ये आणि शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसवर होणारी आगपाखड पाहता निवडणूक उभी राहीपर्यंत आणि निकालानंतर काय होणार हे सांगणे कोणालाच शक्य नाही. कारण काहीही करुन सत्तेत आणि मालामाल खुर्चीत हेच सर्वांचे ध्येय आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत महायुतीतून निवडून येऊन महाआघाडीला जशी ठाकरे गटाने मिठी मारली व मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली तोच कित्ता राज्यात कुणीही गिरवू शकतो. कॉंगेसने शिवसेनेला मोठा भाऊ आणि उद्धव ठाकरेंना निवडणूक चेहरा मानायला ठाम नकार दिला आहे. शिवसेनेची गरज संपली अशी कॉंग्रेसची वर्तणूक आहे. पण शिवसेनेला आतले डाव, बाहेरचे डाव पक्के पाठ आहेत. आमदारांचे हुकमी संख्याबळ मिळवण्याकडे ठाकरेंचे प्राधान्य आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही, कॉंग्रेसकडे जसा सांगली पॅटर्न तसा शिवसेनेकडे ठाकरे पॅटर्न आहे. पवार पॅटर्न तर कुणाला कळण्यापलीकडे असतो. कॉंगेस 105, शिवसेना ठाकरे 100 जागा आणि राष्ट्रवादी 83 जागा असा तेथे फॉर्म्युला दिसतो आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे 40 आमदार त्यांना सोडून अजितदादासोबत गेले, ती पोकळी शरद पवारांनी भरुन काढली आहे. जागोजागचे सरदार त्यांनी पक्षात घेऊन आपला तंबू निवडणुकीसाठी सज्ज केला आहे. तुलनेत शिवसेना आमदारांच्या रिक्त जागा ठाकरे भरू शकलेले नाहीत. आता दसरा मेळावे होतील. त्यामध्ये ठाकरे, शिंदे, पंकजा मुंडे, मनोज जरांगे आणि रा. स्व. संघ
धनगर समाज आदी मेळावे लक्षवेधी ठरतील, यातील राजकीय पक्षांचे मेळावे शक्ती प्रदर्शन करतीलच. जोडीला निवडणूक व निवडणुकीनंतरची रणनीती यांचे संकेत दिले जातील. हरियाणा निकालानंतर महायुतीचा विश्वास आणि उत्साह वाढला आहे. लाडकी बहिणचे पैसे खात्यावर जमा होत असलेने बहिणी पाठराखण करतील असा विश्वास निर्माण झाला आहे, शेती आणि शेतकरी यांना प्रोत्साहन दिले जाते आहे. सर्व माध्यमातून जाहिरातींचा मारा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा निकाल पथ्यावर पडल्याने महायुतीत विश्वास आणि उत्साह दुणावला आहे. या निकालाचा आउटगोइंगवरही परिणाम शक्य आहे.ओघानेच महायुती उत्साहात आहे, तर महाआघाडीचं म्हणणं, भाजपा विरोधात सर्व पक्ष एकत्र येतात तेथे भाजपाचा पराभव अटळ असतो. जागांसाठी न भांडता जिंकण्यासाठी पावलं टाका असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र दोन्ही कडची सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक परिस्थिती वेगळी. महाराष्ट्रात आज जी राजकीय परिस्थिती आहे आणि राजकारणाचा चिखल करुन रोज एकमेकांवर तो फेकला जातोय तशी राजकीय परिस्थिती देशात आणि महाराष्ट्रात यापूर्वी कधीही कुठेही नव्हती. पूर्वी महाराष्ट्रात एका पक्षाला सत्ता मिळत असे. मग एकविचाराची सत्ता येऊ लागली. दुचाकी सत्ता, नंतर तीन चाकी रिक्षा सत्ता आणि यावेळी तीन चाकावर भागते का चारचाकी गाडी होते हे बघावे लागणार आहे. अपक्ष आणि छोटे पक्ष, तिसरी आघाडी, मनसे असे छोटे छोटे घटक व ओबीसी, मराठा, सुराज्य, जनसुराज्य अशा संघटनांनाही महत्त्व येण्याची शक्यता आहे. हरियाणा निवडणुकीत डबल इंजिन ही भूमिका महत्त्वाची ठरली. ओघाने निवडणुकीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. तूर्त हरियाणा निवडणूक निकालाने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे तर आघाडी सावध झाली आहे. मतदार काय करणार हे स्वतंत्र प्रकरण आहे.