For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साडेसात वर्षांनी मिळाले वायुदलाच्या विमानाचे अवशेष

06:11 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
साडेसात वर्षांनी मिळाले वायुदलाच्या विमानाचे अवशेष
Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

Advertisement

वायुदलाच्या एका वाहतूक विमानाचे अवशेष सुमारे साडेसात वर्षांनी बंगालच्या उपसागरात आढळून आले आहेत. भारतीय वायुदलाचे एएन-32 विमान 2016 मध्ये एका मोहिमेदरम्यान बेपत्ता झाले होते. या विमानातून 29 जण प्रवास करत होते.

नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ओशियन टेक्नॉलॉजीने एका ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकलद्वारे (एयुव्ही) काही छायाचित्रे प्राप्त केली होती. या छायाचित्रांच्या विश्लेषणानंतर चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 310 किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागरात विमानाचे अवशेष असल्याचे स्पष्ट झाले होते.

Advertisement

एयुव्हीकडून प्राप्त छायाचित्रे पाहता वायुदलाच्या एएन-32 विमानाचे हे अवशेष असल्याचे वाटत आहे. दुर्घटनास्थळाविषयी अधिक माहिती मिळविण्यात आली असता तेथे पूर्वी कुठलीच विमान दुर्घटना घडली नव्हती असे समोर आले. यामुळे हे अवशेष 2016 मध्ये कोसळलेल्या एएन-32 विमानाचेच असावेत, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

विमानाच्या शोधासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची संस्था नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ओशियन टेक्नॉलॉजीने अलिकडेच संभाव्य क्रॅश साइटवर खोल समुद्रात एक ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल तैनात केला होता. त्याच्याकडून प्राप्त छायाचित्रांच्या आधारावर अवशेषांचा शोध लावण्यात आला आहे. हा शोध मल्टी-बीम सोनार (साउंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग), सिंथेटिक अपर्चर सोनार आणि हाय-रिझोल्युशन फोटोग्राफी समवेत अनेक पेलोडचा वापर करून 3400 मीटर म्हणजेच सुमारे 3.4 किलोमीटर खोलवर लावण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

वायुदलाचे विमान एएन-32 चेन्नईहून पोर्ट ब्लेयरच्या दिशेने जात होते, या विमानाने चेन्नईच्या तांबरम विमानतळावरून 22 जुलै 2016 रोजी सकाळी 8.30 वाजता उ•ाण केले होते. उ•ाणाच्या 16 मिनिटांनी विमान रडारवरून गायब झाले होते. सकाळी 8.46 वाजता वैमानिकाशी अखेरचा संपर्क झाला होता. त्यादरम्यान विमान 23 हजार फुटांच्या उंचीवर उडत होते. सर्वकाही सुरळीत असल्याचे वैमानिकाने सांगितले होते, परंतु यानंतरच विमान रडारवरून गायब झाले होते. या विमानातून 29 जण प्रवास करत होते आणि यात चालक दलाचे 6 सदस्य सामील होते. या विमानाच्या शोधाकरता नौदलाने बंगालच्या उपसागरात स्वत:च्या 13 मोठ्या नौकांना तैनात केले होते. तसेच एका पाणबुडीचीही मदत घेतली होती.

Advertisement
Tags :

.