लेबनॉननंतर इराणला सीरियात झटका
अलेप्पो शहरावर बंडखोरांचा कब्जा : इराणी जनरलचा घेतला जीव
वृत्तसंस्था/ दमास्कस
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा शक्तीक्षय झाल्यावर आता इराणला सीरियात मोठा झटका बसला आहे. इस्रायलच्या अभियानानंतर सीरियात इराणचे समर्थनप्राप्त असद सरकारच्या विरोधात बंडखोरांनी मोठा हल्ला केला आहे. विविध बंडखोर गटांनी मिळून राबविलेल्या अभियानात सीरियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर अलेप्पोवर कब्जा केला आहे. अलेप्पोवर 2016 पासून असाद सरकार अणि इराण समर्थक मिलिशियाचे नियंत्रण होते. बंडखोरांनी सीरियातील वरिष्ठ इराणी सैन्य सल्लागार, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सचे ब्रिगेडियर जनरल किउमार्श पोरहाशमी यांची अलेप्पोमध्ये हत्या केली आहे.
सीरियात बंडखोर गटांच्या हल्ल्यात 89 लोक मारले गेले आहेत. मागील 4 वर्षांमध्ये बंडखोरांकडून करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला होता. बंडखोरांना सीरियन सैन्याच्या एका तळावरही कब्जा केला आहे. या बंडखोरांची एक संघटना हयात तहरील अल-शमला अल कायदाकडून समर्थन प्राप्त आहे. सीरियन सैन्यायच 46 तळांवर कब्जा केला असल्याचा दावा बंडखोर गटांनी केला आहे.
सीरियन बंडखोरांचा हा हल्ला असद सरकारसाठी देखील धक्कादायक आहे. 2020 मध्ये रशिया आणि तुर्कियेच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविरामानंतर ही पहिली महत्त्वपूर्ण झटापट आहे. सीरियन सरकार आणि इराणी मिलिशियाला रोखण्यासाठी हल्ला करण्यात आला होता असे बंडखोरांनी म्हटले आहे.
हिजबुल्लाहचा मोठा पराभव
इराणने लेबनॉनमध्ये स्वत:ची सर्वात मजबूत प्रॉक्सी हिजबुल्लाहला इस्रायलच्या हातून पराभूत होत असतान पाहिले आहे, अशास्थितीतच बंडखोरांनी सीरियात हल्ला केला आहे. इस्रायलने लेबनॉनमध्ये कारवाई करत हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह समवेत बहुतांश नेत्यांना संपविले आहे. या दहशतवादी समुहाची सीरियन बंडखोरांपासून असद सरकारला वाचविण्यास महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सीरियाच्या बंडखोर गटांनी टेलिग्राम चॅनेलवर हल्ल्याची घोषणा केली. तुर्कियेच्या सीमेनजीक असलेल्या इदलिब प्रांतात सीरियन अध्यक्ष बशर अल-असादच्या सैन्याकडून झालेल्या गोळीबाराच्या प्रत्युत्तरादाखल हा हल्ला असल्याचा दावा बंडखोरांनी केला आहे.
असद सरकारविरोधात मोठे अभियान
बंडखोरांनी असद सरकारविरोधात एक मर्यादित अभियान सुरु केले होते, तर सीरियन सैन्य आणि इराणी मिलिशियाने बंडखोरांच्या ताब्यातील इदलिब शहरावर हल्ला केला आणि 30 हून अधिक नागरिकांना ठार केले होते. अलेप्पोनंतर आसपासच्या शहरांमधून सीरियन सुरक्षादलाने पळ काढल्याने बंडखोरांनी अभियानाचा विस्तार केला आहे.
इराणी जनरलची हत्या
बंडखोरांनी अलेप्पोत ठाण मांडून बसलेला इराणचा वरिष्ठ सैन्य सल्लागार ब्रिगेडियर जनरल किउमार्स पोरहाशमीची हत्या केली आहे. अभियानाचे लक्ष्य असदचे सैन्य आणि इराणी मिलिशिया असल्याचे बंडखोरांच्या आघाडीचे प्रवक्ते हसन अब्देलघानी यांनी म्हटले आहे.
गृहयुद्धात अलेप्पो शहर उद्ध्वस्त
1986 मध्ये युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त करणारे आणि जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक अलेप्पो 2012 मध्ये गृहयुद्धाचे मुख्य केंद्र ठरले होते. अलेप्पो शहर हे सीरियाचे मुख्य आर्थिक केंद्र देखील होते. गृहयुद्धामुळे या शहरातील सर्व ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त झाल्या आहेत. हे शहर आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.