For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार जूननंतर...

06:19 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
चार जूननंतर
Advertisement

आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते लोकसभा निवडणूक निकालाकडे. अनेकांचे अनेक कयास आहेत. काहींनी अभ्यास केले आहेत. ज्यांचे देशभर नेटवर्क आहे त्यांनी खासगीत सर्व्हे केले आहेत. काहींचे सट्टा बाजारातील सट्ट्यावर लक्ष आहे. ओघानेच जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीत जनता कोणाला कौल देते याकडे जगाचे, देशाचे लक्ष आहे. महाराष्ट्रात षटकोनी पक्षांची दुरंगी लढत  आहे. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आहे. प्रथमच लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप झाले अशा तक्रारी आहेत. देशात मोठ्या प्रमाणात नोटा जप्त झाल्या आहेत. ओघानेच महाराष्ट्रात काय होणार, खरे कोण, नकली कोण, बारामतीत काय होणार, छोटे-छोटे पक्ष काय निर्णय करणार, यदा-कदाचित भाजपाचे स्पष्ट बहुमत घसरले तर एनडीए घटक पक्ष आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष केणती भूमिका घेणार हे आणि असे असंख्य प्रश्न सर्वांच्या मनात घोळताना दिसत आहेत. जोडीला ज्यांचे मतदान मशिनबद्ध झाले आहे. त्यांची धाकधूक वाढली आहे. सर्वजण लोकमताचा फैसला काय येतो यासाठी चार जूनची प्रतीक्षा करत आहेत. चार जून ही निकालाची तारीख आहे. एक जून शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे आणि त्याचदिवशी सायंकाळी सहानंतर एक्झीट पोलचे निष्कर्ष समोर येतील आणि त्यानंतर हालचालींना प्रारंभ होईल. इंडिया आघाडीतील राहूल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे वगैरे मंडळी उच्चारवात सत्ताबदल होणार. इंडिया आघाडी जिंकणार, भाजप फुटणार असे सांगत आहेत तर भाजपाची एनडीए महायुती अबकी बार चारसो पार म्हणत आहे. एनडीएने महाराष्ट्र-कर्नाटकात फटका बसणार हे गृहीत धरुन दक्षिण भारतात जबरदस्त कष्ट घेतले आहेत. त्यामुळे त्यांना 400 नसल्या तरी 370 तरी जागा मिळतील असा दावा आहे.  रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाजप किमान 310 जागा जिंकून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल असे चौथ्या टप्प्याच्या मतदानानंतर म्हटले आहे तर डावे विचारवंत वेगळेच सांगत आहेत. राहूल गांधी यांनी भाजपा दीडशे जागा मिळवेल असे म्हटले आहे. फलोदी सट्टा बाजाराने भाजपा 370 पार करेल असे म्हटले आहे. भाजपाने स्वत:चे मूल्यमापन केले आहे त्यामध्ये 317 पेक्षा कमी जागा नाहीत अशी आकडेवारी आहे. पण हे सारे अंदाज झाले. खरा कौल चार तारखेला येईल व संध्याकाळी दिल्लीत आणि गल्लीतही लाडू, पेढे वाटले जातील. ओघानेच चार जून अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रासाठी चार जूनचा निकाल दिल्लीत कुणाचे सरकार आणि खरी शिवसेना, खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा इतपत मर्यादित नाही. या निकालांचे चिंतन होईल आणि अनेकांना नवे घुमारे फुटतील. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात किंवा त्यापूर्वीच काही दुकाने बंद होतील. पळा, पळा कोण पुढे तो अशी स्थिती होऊ शकते. पळायची दिशा ही निकाल आणि मतदानाची टक्केवारी यावर अवलंबून राहिल. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चौथ्या टप्प्याचे मतदान झाल्यावर आणि काल पाचव्या टप्प्याच्या मतदानानंतर दोन जाळी पाण्यात टाकली आहेत. त्यामध्ये ते कुणाचा कार्यक्रम करतात की स्वत:चाच करुन घेतात हे चार जून नंतर स्पष्ट होईल. काँग्रेस विचाराच्या लहान-लहान पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यास हरकत नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले आहे. त्यांचे हे मार्गदर्शन अजितदादा पवारांसाठी, उद्धव ठाकरेसाठी, तृणमूल काँग्रेससाठी का इंडिया आघाडीतील अन्य कोणासाठी हे लगेच सांगता येणार नाही. भाजपाला महाराष्ट्र तगड्या विश्वासू मराठा नेत्यांच्या ताब्यात द्यायचा आहे. हे लपून राहिलेलं नाही. भाजपाने नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, विजयसिंह मोहिते-पाटील, अजितदादा पवार आणि पक्षातील चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे वगैरेंना तपासून बघितले. पण भाजपा महाराष्ट्र आपलासा करेल असा मराठा लिडर शोधू शकलेला नाही. भाजपा युतीने दहा टक्के मराठा आरक्षण दिले पण मराठा आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील हे खुश नाहीत. लोकसभा निवडणुकीत घसरलेला मतदानाचा टक्का नाराज मराठा समाज असावा असा तर्क आहे. जरांगे फॅक्टर बीड, मराठवाड्यात आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात सुप्त सक्रिय दिसला तरी तो महायुतीला जोराचा फटका देण्याची शक्यता आहे. बीडमध्ये ‘माधव’ पॅटर्न पुन्हा अॅक्टीव्हेट होत मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसते आहे. निकाला पाठोपाठ लगेचच जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे व मराठा आंदोलक सर्व आरक्षित घटकांना सोबत घेऊन विधानसभेच्या 288 जागा लढवणार असे म्हटले आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल व जरांगे फॅक्टरचा परिणाम पहावा लागेल. भाजपाने विधानसभा निवडणूक महायुती म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असे म्हटले आहे. पण खरी शिवसेना, नकली शिवसेना, शरद पवारांनी काँग्रेस विलीनीकरणाचे दाखवलेले गाजर अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचे परिणाम चार जून नंतर दिसतील. शरद पवारांनी पाचव्या टप्प्यानंतर आणखी एक खुलासा केला आहे. त्यामध्ये महाआघाडीचे मुख्यमंत्री म्हणून आमचा कुणाचा एकनाथ शिंदेंच्या नावाला विरोध नव्हता. शिवसेनेत शिंदेंचे नाव चर्चेत होते व पण उद्धव ठाकरेंचे नाव पुढे आले. आजही आमचे एकनाथ शिंदेंशी चांगले संबंध आहेत असे म्हटले आहे. पवारांच्या या विधानाचा आता नव्याने संदर्भ तपासला जातो आहे. यात ते कुणाचा कार्यक्रम करणार आहेत हे महत्त्वाचे. उद्या विधानसभेपर्यंत महाआघाडी टिकली तर मोठा भाऊ कोण हा वाद होणारच. लोकसभेला शिवसेनेकडे महाआघाडीचे नेतृत्व होते पण चार जूननंतर नव्याने सारे होणार आणि त्यामध्ये काँग्रेस मोठ्या भावाचा दावा करेल असे दिसते. शरद पवारांनी मतदानाच्या शेवटच्या पर्वानंतर राज्यात फेकलेल्या जाळ्यात कोण अडकते यासाठी चार जून महत्त्वाची तारीख आहे. अजितदादा पवार यांचा परफॉर्मन्सही त्यांचे भवितव्य ठरवेल. राज्यात मंत्रीमंडळात बदलही संभवतात. केंद्रात कोणाचे सरकार, राज्यातील कोणाला मंत्रीपद, राज ठाकरेंची काय सोय, मोदींना थोडे संख्याबळ कमी पडले तर उद्धव ठाकरे काय करणार, ऑपरेशन कमळ सुरु होणार का? यासह साऱ्या गोष्टी चार जून नंतर स्पष्ट होणार आहेत. ओघानेच चार जून महत्त्वाची, निर्णायक, अनेक शक्यतांची आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.