हरिद्वारनंतर बाराबंकीतील मंदिरात चेंगराचेंगरी
उत्तर प्रदेशातील दुर्घटनेत दोघांचा मृत्यू : 29 जण जखमी
वृत्तसंस्था/ बाराबंकी
उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मानसादेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्येही अशीच दुर्घटना घडली आहे. बाराबंकी जिह्यातील हैदरगड भागात असलेल्या पौराणिक औसनेश्वर महादेव मंदिरात रविवारी मध्यरात्रीनंतर एक मोठा अपघात झाला. चेंगराचेंगरीच्या घटनेत दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 29 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. प्रशांत कुमार (16) आणि रमेश कुमार (35) अशी मृतांची नावे आहेत.
श्रावण महिन्याच्या सोमवारी जलाभिषेकासाठी जमलेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीत रात्री 12 वाजल्यानंतर जलाभिषेक सुरू झाला. याचदरम्यान, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरात अचानक विद्युत प्रवाह पसरल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. काही माकडांनी विजेच्या तारेवर उड्या मारल्यामुळे तार तुटली आणि मंदिराच्या परिसरातील शेडवर पडल्यामुळे विद्युत प्रवाह पसरल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. विद्युत प्रवाह पसरल्याने भाविकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोक आरडाओरडा करत इकडे तिकडे धावू लागले. या धावपळीत दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर महिला आणि मुलांसह 29 जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री 1.30 वाजता जलाभिषेकादरम्यान मंदिर परिसरात अचानक विद्युत प्रवाह पसरल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी 24 तासात या घटनेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागितला आहे. अपघातानंतर पोलिसांनी 29 जणांना रुग्णवाहिकेने हैदरगड सीएचसी येथे आणले. 9 जणांना त्रिवेदीगंज आणि 6 जणांना कोठी सीएचसी येथे पाठवण्यात आले. 5 गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
औसनेश्वर मंदिर जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी अंतरावर आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अपघात झाला तेव्हा सुमारे 3 हजार लोक दर्शनासाठी रांगेत उभे होते. यापूर्वी रविवारी सकाळी हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली होती. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक लोक जखमी झाले.