निवडून आल्यानंतर कारवार जिल्ह्याचा सर्वोत्तम विकास करा
काँग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना गोकर्ण मठाचे श्री राघवेश्वर भारती महास्वामीजींचा आशीर्वाद
कारवार : कारवार लोकसभा मतदार संघातून निवडून आल्यानंतर जिल्ह्याचा सर्वोत्तम विकास करा, असा आशीर्वाद काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना गोकर्ण येथील श्री रामचंद्रापूर मठाचे श्री राघवेश्वर भारती महास्वामीजी यांनी दिले. गुरुवारी डॉ. निंबाळकर यांनी गोकर्ण येथे महास्वामींची भेट घेतली आणि महास्वामीना फळ पुष्प अर्पण करून गौरव केला. त्यावेळी महास्वामींनी निंबाळकर यांच्याशी काही वेळ निवडणूक आणि जिल्ह्यासंदर्भात चर्चा केली. पुढे महास्वामीनी निंबाळकर यांना मंत्राक्षता देऊन आशीर्वाद दिले. आणि निवडून आल्यानंतर तुमच्याकडून चांगली सेवा होऊ देत, असे सांगितले. यावेळी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य मार्गारेट अल्वा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साई गावकर, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष भुवन भागवत, कारवार जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य प्रदीप नायक, केपीसीसीचे माजी कार्यदर्शी गोपाळकृष्ण नायक आदी उपस्थित होते.
दरम्यान, बुधवारी शिरसी येथील डॉ. आंबेडकर भवनात शिरसी ब्लॉक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना डॉ. निंबाळकर म्हणाल्या, जिल्हावासियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कार्य करण्यासाठी कार्यबद्ध आहोत. आमच्या युवकांना आणि युवतींना रोजगार मिळाला पाहिजे. कारवार जिल्ह्यातील श्रीमंत संस्कृती राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख करून देण्यासाठी कार्य झाले पाहिजे. आणि हे सर्व साध्य करण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. ही लढत काँग्रेस आणि भाजपमधील नाही. कुणाचा अपमान करण्यासाठी ही लढत नाही. तर गरिबांवर होणाऱ्या अन्यायाला लोकसभेत आवाज उठविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. भाजपचे उमेदवार सहावेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांच्यासमोर मी खूप लहान आहे. तथापी मीपण गेल्या 15 वर्षापासून समाजसेवा केली आहे. जनतेच्या सुखदु:खात सहभागी झाली आहे. खानापूर आणि शिरसीत मोठा फरक नाही. दोन्ही तालुक्यात अरण्य अतिक्रमण समस्या उभी ठाकली आहे. लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात अरण्य अतिक्रमण समस्येबद्दल आवाज उठविणार आहे, असे पुढे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी भाजपच्या धोरणावर विशेष करून केंद्रातील भाजप सरकारला रोजगार निर्मितीच्या महागाई रोखण्यात कसे अपयश आले आहे, यावरून जोरदार टीका केली.