ई-बसनंतर आता ‘एलएनजी’ बसची प्रतीक्षा
कोल्हापूर :
राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या डिझेलवर होणाऱ्या खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने एलएनजीच्या (लिक्विडीफाईड नॅचरल गॅस) बस वापरण्यास प्राधान्य दिले आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक विभागाला पाच एलएनजी बस दिल्या असून त्याचा वापराही सुरू झाला आहे. याच धर्तीवर कोल्हापूर विभागही एलएनजी बसच्या प्रतीक्षेत आहे.
एसटी महामंडळाच्या बहुतांश बस डिझेलवर चालतात. महाग होत चाललेल्या डिझेलमुळे बस चालविण्यासाठी महामंडळाच्या खर्चातही वाढच होत आहे. यामुळे नफ्यावर परिणाम होतो. याशिवाय, डिझेलच्या गाड्यांमुळे उत्सर्जित होणाऱ्या विषारी घटकांमुळे हवा प्रदूषणात वाढ होते. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने विविध पातळ्यांवर बदल घडविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून एसटी महामंडळाच्या ताफ्यात एलएनजी बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्यस्थितीत डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांनाच किटमध्ये बदल करून एलएनजी बसमध्ये रूपांतरित केले जात आहे. एलएनजी बसगाड्यांमध्ये सुमारे 180 किलो गॅस (410 लिटर) भरण्याची क्षमता आहे. टाकी पूर्ण भरल्यावर बस सुमारे 700 ते 800 किलोमीटरपर्यंत धावू शकते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावर या बसचा उपयोग होणार आहे. एसटी महामंडळ 5 हजार डिझेल बस टप्प्याटप्याने एलएनजी पर्यायी इंधन वाहनांमध्ये रूपांतरित करण्याच्या विचारात आहे. डिझेलवरून एलएनजीमध्ये बसचे रूपांतर केल्यामुळे एसटी बसमुळे सध्या होणारे प्रदूषण कमी होईल आणि इंधनावरील खर्चही कमी होईल.
पहिल्या टप्प्यात एसटीच्या नाशिक विभागाला पाच एलएनजी बस उपलब्ध झाल्या आहेत. याच धर्तीवर एसटीच्या कोल्हापूर विभागालाही एलएनजीच्या बस मिळाल्यास डिझेलवरील खर्चात बचत होणार आहे. सध्या कोल्हापूर विभागाला वर्षाला सुमारे 17 कोटी डिझेलवर खर्च होत आहे. सध्या एसटीच्या कोल्हापूर विभागाकडे 717 बस असून 6 बस इलेक्ट्रीक आहेत.
नवीन एलएनजी बसच ठरणार फायदेशीर
सध्या कोल्हापूर विभागाकडील बहुतांशी बसेस 9 ते 14 वर्षापूर्वी खरेदी केलेल्या बस आहेत. 15 वर्षानंतरच्या बस स्क्रॅप करण्याचे आदेश आहेत. जर जुन्या बसचे डिझेल इंजिन काढून एलएनजीमध्ये रूपांतर केल्यास चार ते पाच वर्षच या बस वापरात येणार आहेत. त्यामुळे नवीन एलएनजीच्या बस घेणेच फायदेशीर ठरू शकते.