बंगालनंतर ‘रेमल’चा ईशान्येत कहर
मिझोरममध्ये खाण खचल्याने 17 जणांचा मृत्यू : 16 बेपत्ता : आसाममध्ये एक बळी
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
तीव्र चक्रीवादळ रेमल रविवारी रात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात 135 किलोमीटर प्रतितासाच्या वेगासह धडकले होते. यादरम्यान चक्रीवादळाने मोठे नुकसान केले होते. परंतु केवळ पश्चिम बंगाल नव्हे तर ईशान्येच्या राज्यांमध्येही याचा कहर दिसून येत आहे. मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये अतिवृष्टीमुळे अनेक जणांचा बळी गेला आहे. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये 10 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर मिझोरमच्या आयजोलमध्ये दगडांची खाण खचल्याने 17 जणांना जीव गमवावा लागला असून 12 जण बेपत्ता आहेत. याचबरोबर मंगळवारी आसाममध्ये अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांमुळे 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.
बांगलादेशच्या किनारी क्षेत्रात चक्रीवादळ धडकल्यानंतर तेथे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1,50,457 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. बांगलादेशच्या किनारी जिल्ह्यांमध्ये एकूण 9,424 निवारा केंद्रे सुरू करण्यात आली असून तेथे 8 लाखाहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. याचबरोबर 52,146 पाळीव प्राण्यांनाही तेथे ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान शेख हसिना यांच्या निर्देशानुसार सरकारने उचललेल्या पावलांमुळे तेथे मोठी जीवितहानी टळली आहे.
मिझोरममध्ये मोठी दुर्घटना
चक्रीवादळ रेमलच्या प्रभावामुळे सुरू असलेल्या पावसादरम्यान मंगळवारी सकाळी मिझोरमच्या आयजोल जिल्ह्यात दगडांची खाण खचल्याने 17 जणांना जीव गमवावा लागला तर 12 जण बेपत्ता आहेत. आयजोल शहराबाहेरील मेलथुम आणि हिलीमेन या भागादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत, परंतु अतिवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक अनिल शुक्ला यांनी दिली आहे.
राज्यातील मार्ग बंद
हुनथरमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-6 वर पाणी साचल्याने आयजोलचा देशाच्या उर्वरित हिस्स्याशी असलेला रस्तेसंपर्क तुटला आहे. अनेक राज्य महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद असल्याचे समजते. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांची पातळी वाढली आहे, यामुळे नदीकाठानजीक राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी राज्यातील स्थितीवर तातडीची बैठक घेतली आहे.
आसाममध्ये अतिवृष्टी
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आसाममध्ये अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीदरम्यान एका 17 वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. मोरीगाव जिल्ह्यातील दिघलबोरीमध्ये एका रिक्षावर झाड कोसळल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी बोरदोलोई एम्फीचा मृत्यू झाला. तर रिक्षातून प्रवास करणारे चार जण जखमी झाले आहेत. सोनितपूर जिल्ह्यातील ढेकियाजुलीमध्ये एका स्कूलबसवर झाड कोसळल्याने 12 मुले जखमी झाली. या जखमी मुलांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मणिपूरमध्ये जनजीवन प्रभावित
सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मणिपूरच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी पाणी साचले, यामुळे तेथील जनजीवन प्रभावित झाले आहे. इंफाळ पूर्व जिल्ह्यात एंड्रो पार्किंग, चेकोन, महाबली आणि वांगखेईमध्ये पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली. परंतु राज्यात अतिवृष्टीमुळे कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
अतिवृष्टीमुळे मिझोरममध्ये सर्व शाळा आणि शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम करविण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून यात 2 जणांचा मृत्यू झाला. आयजोलच्या सलेम वेंगमध्ये भूस्खलनानंतर एक इमारत कोसळली असून या दुर्घटनेत तीन जण बेपत्ता झाले आहेत.
30 मेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागानुसार ईशान्येतील राज्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव सोमवारपासून सुरू झाला. आसामसमवेत ईशान्येतील काही राज्यांमध्ये सोमवारपासून पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये 30 मेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आसाम आणि मेघालयात 29 आणि 30 मे रोजी तीव्र अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.