For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडव्या संघर्षानंतर सिंधू दुसऱ्या फेरीत गारद

06:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
कडव्या संघर्षानंतर सिंधू दुसऱ्या फेरीत गारद
Advertisement

सिंगापूर ओपन बॅडमिंटन : मारीनची सिंधूविरुद्ध विजयी परंपरा कायम: महिला दुहेरीत त्रिसा-गायत्रीचा दक्षिण कोरियाच्या अव्वल मानांकित जोडीला धक्का

Advertisement

वृत्तसंस्था /बँकॉक

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू व दोन वेळची ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधूचा सिंगापूर ओपनमधील प्रवास दुसऱ्या फेरीत संपला. स्पेनची दिग्गज खेळाडू कॅरोलिन मारीनविरुद्ध आघाडी घेतल्यानंतरही सातत्य राखण्यात अपयश आल्याने तिला पराभवाला सामोरे जावे लागले. याशिवाय, महिला दुहेरीत मात्र त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद जोडीने दक्षिण कोरियाच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बाएक हा ना-ली सो ही जोडीला पराभवाचा धक्का दिला. तसेच पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयलाNपॅकअप करावे लागले. गत आठवड्यात थायलंड ओपनचे जेतेपद पटकावणाऱ्या सिंधूचा सामना गुरुवारी स्पेनची दिग्गज खेळाडू कॅरोलिन मारिनविरुद्ध झाला. 68 मिनिटे चाललेल्या या लढतीत मारीनने सिंधूला 21-13, 11-21, 20-22 असे नमवले. गतवर्षी डिसेंबरच्या अखेरीस झालेल्या डेन्मार्क ओपनमधील लढतीनंतर दोघी प्रथमच सात महिन्यानंतर आमनेसामने आल्या. पहिला गेम सिंधूने 21-13 असा सहज जिंकत धडाक्यात सुरुवात केली. पण, अनुभवी मारीनने दुसऱ्या गेममध्ये शानदार पुनरागमन केले व हा गेम 21-11 असा जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. तिसरा व निर्णायक गेम मात्र चांगलाच चुरशीचा झाला. दोघींत एकेका गुणांसाठी चांगलाच संघर्ष पहायला मिळाला. एकवेळ सिंधूने 18-15 अशी आघाडी घेतली होती पण मोक्याच्या क्षणी मारीनने आपला खेळ उंचावला व 20-20 अशी बरोबरी साधली. यानंतर सलग दोन गुणाची कमाई करत तिने हा गेम 22-20 असा जिंकला व पुढील फेरीत स्थान मिळवले. सिंधू व मारीन आतापर्यंत 17 वेळा आमनेसामने आल्या आहेत, यामध्ये 12 सामन्यात मारीनने तर 5 सामन्यात सिंधूने बाजी मारली आहे.

Advertisement

महिला दुहेरीत त्रीसा-गायत्रीचा धमाका

पीव्ही सिंधू, के श्रीकांत, प्रणॉय, सात्विक-चिराग सारखे दिग्गज खेळाडू पराभूत होत असताना महिला दुहेरीत मात्र युवा त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी धक्कादायक निकालाची नोंद केली. युवा भारतीय जोडीने दक्षिण कोरियाच्या बाएक हा ना-ली ही जोडीला 21-9, 14-21, 21-15 असे नमवले. या विजयासह त्रीसा व गायत्री यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.

प्रणॉयही स्पर्धेबाहेर

पुरुषांच्या एकेरीतील एका सामन्यात एच एस प्रणॉयला स्पर्धेबाहेरचा रस्ता धरावा लागला. जपानच्या केंटा निशिमोटोने प्रणॉयला 21-12, 14-21, 21-15 असे हरवले. ही लढत 59 मिनिटे चालली. प्रणॉयच्या पराभवासह पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान देखील संपुष्टात आले आहे.

Advertisement
Tags :

.