Sangli : 90 वर्षांच्या मागणीनंतर इस्लामपूरचे नाव आता उरुण-ईश्वरपूर
इस्लामपूरचे नाव आता उरुण-ईश्वरपूर
इस्लामपूर : इस्लामपूरच्या नामांतरापाठोपाठ 'ईश्वरपूर' शहरवासीयांच्या मागणीनुसार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने अधिसूचनेद्वारे इस्लामपूर नगरपालिकेचे नाव बदलून 'उरुण-ईश्वरपूर' करण्याचे आदेश मंगळवारी दिले. राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासनाचे उपसचिव अनिरुद्ध जेबळीकर यांनी ही अधिसूचना काढली. दरम्यान शहरात भाजप व घटक पक्षांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.
इस्लामपूर नामांतरणाची मागणी गेल्या ९० वर्षांहून अधिक काळाची होती. त्यासाठी राज्य व स्थानिक पातळीवरील अनेक नेत्यांनी पाठपुरावा केला होता. पावसाळी अधिवेशनात आ. सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदमध्ये ही मागणी केली. या नामांतराचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला होता. भारत सरकारच्या विज्ञान आणि प्रद्योगिकी विभागाने १५ ऑक्टोबरच्या अध्यादेशाने याला हिरवा कंदील दाखविला होता. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने ३ नोव्हेंबर रोजी अनुमती दिली.
इस्लामपूरचे नामांतर 'ईश्वरपूर' करण्याचा निर्णय झाल्यानंतर उरुणमधील नागरिकांच्या भावना दुखावल्या होत्या. पूर्वीपासून या शहराची ओळख उरुण-इस्लामपूर असल्याने नामांतर उरुण-ईश्वरपूर व्हावे, अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी माजी पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दरम्यान राज्य शासनातील अनेक मंत्र्यांनी हे नामांतर करण्याची ग्वाही दिली होती. दरम्यान मंगळवारी इस्लामपूर नगरपालिकेचे नाव बदलून 'उरुण-ईश्वरपूर' करण्याची अधिसूचना काढण्यात आली. हा निर्णय होताच शहरात भाजपा पदाधिकऱ्यांनी भाजपा नेते राहुल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतिषबाजी करीत व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
प्रसंगी माजी नगरसेवक कपिल ओसवाल, माजी नगरसेवक सतीश महाडीक, माजी नगरसेवक अमित ओसवाल, महाडीक युवाशक्ती संचालक सुजित थोरात, सत्यवान रासकर, अमोल ठाणेकर, गजानन फल्ले, अमीर हवालदार, दिनेश पोरवाल, कल्पेश पोरवाल, गोपी कोठारी, भरत रावळ, अमर देवताळे, भूषण शहा, तुषार शिंदे, सागर चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व व्यापारी बांधव उपस्थित होते.