20 वर्षांच्या तुरुंगवासानंतर महिला ठरली निर्दोष
स्वत:च्या 4 अपत्यांच्या हत्येचा होता आरोप
वृत्तसंस्था /कॅनबरा
20 वर्षांपासून तुरुंगात कैद ऑस्ट्रेलियातील सर्वात क्रूर आई या नावाने बदनाम झालेल्या कॅथलीन फोल्बिग निर्दोष ठरल्या आहेत. न्यू साउथ वेल्स सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांच्या विरोधात दाखल खटला फेटाळला आहे. कॅथलीन यांच्यावर स्वत:च्याच 4 अपत्यांच्या हत्येचा आरोप होता. कॅथलीन यांनी 1989-99 दरम्यान केलब, पॅट्रिक, सारा आणि लॉरा यांची हत्या केली होती असा आरोप होते. या सर्व मुलांचे वय 19 दिवसांपासून 18 महिन्यांदरम्यान होते. 2003 मध्ये कॅथलीन यांना 40 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 20 वर्षे तुरुंगात राहिल्यावर जून महिन्यात त्यांना निर्दोष ठरवत मुक्त करण्यात आले होते. न्यायालयाने गुरुवारी त्यांच्या विरोधातील सर्व खटले फेटाळले आहेत. कॅथलीन फोल्बिग यांना शिक्षा देण्यासाठी आधार ठरलेले पुरावे विश्वासार्ह नव्हते असे न्यायालयाने म्हटले आहे. एका डायरीच्या आधारावर कॅथलीन यांना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ ठरविण्यात आले होते. चारही मुलांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला होता असे चालू वर्षाच्या प्रारंभीत सुनावणीत सांगण्यात आले होते. या मुलांची हत्या करण्यात आली नव्हती. तपासाच्या वैज्ञानिक निष्कर्षांमधून दुर्लभ जीन म्युटेशनमुळे मुलांचा मृत्यू झाला होता असे स्पष्ट झाले होते.