द.आफ्रिकेची टी-20 मालिकेत विजयी सलामी
आयर्लंडचा 8 गड्यांनी पराभव, रेयान रिक्लेटोन ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ अबुधाबी
दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत सामनावीर रिक्लेटोन आणि हेंड्रीक्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर द. आफ्रिकेने आयर्लंडचा पहिल्या सामन्यात 8 गड्यांनी दणदणीत पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडने 20 षटकात 8 बाद 171 धावा जमविल्या. त्यानंतर द. आफ्रिकेने 17.4 षटकात 2 बाद 174 धावा जमवित हा सामना 14 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी जिंकला.
आयर्लंडच्या डावामध्ये कॅम्फरने 36 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 49, रॉकने 28 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 37, डॉक्रेलने 16 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 21, रॉस अॅडेरने 10 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 18, टेक्टरने 15 चेंडूत 4 चौकारांसह 16 धावा जमविल्या. मार्क अॅडेरने 8 धावा केल्या. आयर्लंडच्या डावात 4 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडने पॉवरप्लेच्या 6 षटकात 63 धावा जमविताना 2 गडी गमविले. आयर्लंडचे अर्धशतक 29 चेंडूत, शतक 69 चेंडूत तर दीडशतक 101 चेंडूत नोंदविले गेले. द. आफ्रिकेतर्फे बार्टमन, फॉर्च्युन, पिटर आणि मुल्डेर यांनी प्रत्येकी 1 गडी तर क्रूगेरने 27 धावात 4 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना रिक्लेटोन आणि हेंड्रीक्स या सलामीच्या जोडीने 78 चेंडूत 136 धावांची शतकी भागिदारी केली. रिक्लेटोनने 48 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांसह 76 तर हेंड्रीक्सने 33 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 51 धावा जमविल्या. ब्रिझेकीने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 19 तर कर्णधार मारक्रेमने 12 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 17 धावा जमवित विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. द. आफ्रिकेच्या डावात 10 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 58 धावा जमविल्या. द. आफ्रिकेचे अर्धशतक 32 चेंडूत तर शतक 62 चेंडूत आणि दीडशतक 92 चेंडूत फलकावर लागले. रिक्लेटोनने 30 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह तर हेंड्रीक्सने 31 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले. द. आफ्रिकेची 10 षटकाअखेर स्थिती बीनबाद 97 अशी होती. आयर्लंडतर्फे मार्क अॅडेर आणि यंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - आयर्लंड 20 षटकात 8 बाद 171 (कॅम्फर 49, रॉक 37, डॉक्रेल 21, रॉस अॅडेर 18, टेक्टर 16, अवांतर 20, क्रूगेर 4-27, मुल्डेर, बार्टमन, फॉर्च्युन व पिटर प्रत्येकी 1 बळी), द. आफ्रिका - 17.4 षटकात 2 बाद 174 (रिक्लेटोन 76, हेंड्रीक्स 51, ब्रिझेकी नाबाद 19, मारक्रेम नाबाद 17, अवांतर 11, मार्क अॅडेर आणि यंग प्रत्येकी 1 बळी).