आफ्रिकेचा वनडे इतिहासातील लाजिरवाणा पराभव
तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेयाचा 431 धावांचा डोंगर : आफ्रिका 276 धावांनी पराभूत
वृत्तसंस्था/ मॅके
यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या 2 सलग पराभवांची अचूक परतफेड करत एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेला विजयी हॅट्ट्रिक करण्यापासून रोखले आणि तिसरा सामना ऐतिहासिक फरकाने जिंकला. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 432 धावांचे आव्हान ठेवले होते मात्र आफ्रिकेला निम्मी षटकेही खेळता आली नाहीत. कांगारुंनी दक्षिण आफ्रिकेला 24.5 ओव्हरमध्ये 155 वर गुंडाळले आणि 276 धावांनी हा सामना जिंकला. कांगारुंनी या सामन्यासह क्लीन स्वीप होण्याची नामुष्की टाळली. तर दक्षिण आफ्रिकेने 2-1 ने मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेने पहिले सलग 2 सामने जिंकत मालिका नावावर केली होती.
विशेष म्हणजे, वनडे क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या फरकाने ऑस्ट्रेलियाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. तर आफ्रिकेचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव ठरला आहे. याआधी, 2023 मध्ये भारताने आफ्रिकेला 243 धावांनी नमवले होते. दरम्यान, या सामन्यात 103 चेंडूत 142 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले तर दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
कांगारुंचा 431 धावांचा डोंगर
मॅकेच्या ग्रेट बॅरिअर रीफ एरिनावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत केवळ 2 गडी गमावून 431 धावा ठोकल्या. प्रारंभी, ऑस्ट्रेलियन सलामीवीर जोडीने दमदार सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 250 धावांची भक्कम भागीदारी रचली. या दोघांनीही शतक झळकावले. कर्णधार मिचेल मार्शने 106 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेडने 103 चेंडूत 142 धावांची आक्रमक खेळी केली. त्यात 17 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कॅमेरॉन ग्रीनने केवळ 47 चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला. वनडेमधील ऑस्ट्रेलियाकडून हे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद शतक ठरले. ग्रीनने 55 चेंडूत 8 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 118 धावा फटकावल्या. अॅलेक्स कॅरीने 7 चौकारासह नाबाद 50 धावा करत त्याला चांगली साथ दिली. यामुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत 2 गडी गमावत 431 धावा केल्या. विशेष म्हणजे, वनडे क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने 400 हून अधिक धावा केल्या आहेत.
आफ्रिकेचे 155 धावांत पॅकअप
432 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची टीम फक्त 155 धावांवर ऑलआऊट झाली. सलामीवीर मार्करम 2 धावा करून सीन अॅबॉटच्या गोलंदाजीवर माघारी परतला. दुसरा सलामीवीर रेयान रिकेल्टनही 11 धावांवर बाद झाला. कर्णधार टेम्बा बावुमा फक्त 19 धावा करू शकला. संघासाठी सर्वात मोठी खेळी डेवाल्ड ब्रेव्हिसने केली. त्याने 28 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 49 धावा ठोकल्या. इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने अखेरीस 24.5 षटकांत संपूर्ण संघ गडगडला. ऑस्ट्रेलियाकडून डावखुरा फिरकी गोलंदाज कूपर कोनोलीने अवघ्या 22 धावांत 5 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 2 बाद 431 (ट्रॅव्हिस हेड 142, मिचेल मार्श 100, कॅमेरॉन ग्रीन 55 चेंडूत 6 चौकार आणि 8 षटकारासह नाबाद 118, अॅलेक्स केरी नाबाद 50, केशव महाराज आणि मुथ्थुस्वामी प्रत्येकी 1 बळी)
दक्षिण आफ्रिका 24.5 षटकांत सर्वबाद 155 (टोनी डी जोर्जी 33, ब्रेव्हिस 49, कोनोली 22 धावांत 5 बळी, अॅबॉट आणि बार्टलेट प्रत्येकी दोन बळी).
ग्रीनचे ऑस्ट्रेलियाकडून दुसरे वेगवान शतक
कॅमेरॉन ग्रीन ऑस्ट्रेलियाकडून वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. द.आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात त्याने केवळ 47 चेंडूंमध्ये शतक झळकावत हा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाकडून वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात वेगाने शतक ठोकण्याचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे. 2023 मध्ये त्याने नेदरलँड्सविरुद्ध केवळ 40 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते.
आफ्रिकेचा वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव (धावांनी)
276 धावा वि ऑस्ट्रेलिया (2025)
243 धावा वि भारत (2023)
182 धावा वि पाकिस्तान (2002)
180 धावा वि श्रीलंका (2013).
ऑस्ट्रेलिया संघाचे सर्वात मोठे विजय (वनडे)
309 धावा वि नेदरलँड्स, (2023)
276 धावा वि साऊथ आफ्रिका, (2025)
275 धावा वि अफगाणिस्तान, (2015)
256 धावा वि नामिबिया, (2003)