वृत्तसंस्था/कराची
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पण करणारा अफगाणिस्तानचा संघ आज शुक्रवारी कराची येथे मोहिमेला सुऊवात करताना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्यांची प्रभावी वाढ सुरू ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवेल, तर दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा ’चोकर्स’चा लेबल काढून टाकण्याचा प्रयत्न करेल. 1998 मध्ये झालेली पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी, ज्याला त्यावेळी नॉकआउट ट्रॉफी म्हटले जात असे, ही दक्षिण आफ्रिकेने जिंकलेली एकमेव आयसीसी वरिष्ठ स्पर्धा आहे.
जगातील, खास करून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील काही महान क्रिकेटपटू दक्षिण आफ्रिकेने निर्माण केलेले असले तरी, त्यांना आणखी जेतेपदे मिळविता आलेली नाहीत. सध्या दक्षिण आफ्रिकेकडे एक संतुलित संघ आहे आणि त्यांच्याकडे एक जबरदस्त फलंदाजी विभागही आहे. कर्णधार टेम्बा बवुमा, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हान डर ड्युसेन आणि एडन मार्करम हे वरच्या फळीला सांभाळतील, तर हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स हे फटकेबाज फलंदाज त्यात पुढे भर घालण्यास सज्ज राहतील.
या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेसमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे त्यांचा कमकुवत मारा आहे. कारण प्रमुख वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्टजे, नांद्रे बर्गर आणि गेराल्ड कोएत्झी दुखापतींमुळे बाहेर पडले आहेत. त्यामुळे वेग, आक्रमकता आणि महत्त्वाच्या क्षणी भेदक गोलंदाजी करण्याची क्षमता यासाठी प्रसिद्ध असलेला कागिसो रबाडा हा पॉवरप्ले आणि शेवटच्या षटकांत दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख शस्त्र असेल. मार्को जानसेनकडूनही लक्षणीय कामगिरी अपेक्षित आहे. दबाव निर्माण करण्याची आणि प्रभावी स्पेल टाकण्याची त्याची क्षमता महत्त्वाची असेल. याशिवाय अलीकडच्या तिरंगी मालिकेत खराब कामगिरी केल्यानंतर लुंगी एनगिडी त्याची लय आणि आत्मविश्वास पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करेल. फिरकी विभागात केशव महाराज आणि तबरेज शम्सी यांच्या भूमिका महत्त्वाच्या असतील.
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापासून दक्षिण आफ्रिकेने 14 एकदिवसीय सामन्यांपैकी फक्त चार सामने जिंकले आहेत. असे असले, तरी इंग्लंड, दुखापतींनी त्रस्त ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानसह दक्षिण आफ्रिकेला बाद फेरीत पोहोचण्याची चांगली संधी आहे. अफगाण संघाची अलीकडच्या आयसीसी स्पर्धांमध्ये कामगिरी प्रभावी झालेली आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेवर वर्चस्व गाजवणे आणि गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात उपांत्य फेरी गाठणे यांचा त्यात समावेश होतो.
त्यांची सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्यांचा फिरकी मारा आहे, ज्यामध्ये रशिद खान, मोहम्मद नबी आणि डावखुरा गोलंदाज नूर अहमद आणि नांगेयालिया खारोटे यांचा समावेश होतो. ते पाकिस्तानमध्ये सर्व तीन गट सामने खेळतील, जिथे फिरकी हा निर्णायक घटक असेल. वेगवान गोलंदाज अझमतुल्लाह उमरझाई हाही अफगाणिस्तानच्या एकदिवसीय यशात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याशिवाय फजलहक फाऊकी हे आणखी एक महत्त्वाचे शस्त्र असेल. तो सुरुवातीला यश मिळवून देण्याची क्षमता बाळगतो. फलंदाजी विभागात रेहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रन यांच्याकडून पुन्हा एकदा चांगली सुऊवात होण्याची अपेक्षा असेल. तथापि त्यांचा कमकुवतपणा मधल्या फळीत आहे, ज्यांना अनेकदा गती राखण्यात अडचण आली आहे. स्पर्धेतील यशासाठी त्यांनी ही समस्या दूर करणे गरजेचे आहे.
►द.आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), टोनी डी झॉर्झी, मार्को जान्सेन, हेन्रिच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डेर, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, रेयान रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी व्हा डर ड्युसेन, कॉर्बिन बॉश.
►अफगाण : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झद्रन, रहमानुल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इक्रम अलिखिल, गुलबदिन नईब, अझमतुल्लाह ओमरझाई, मोहम्मद नबी, रशिद खान, नानग्याल खरोटी, नूर अहमद, फझलहक फारुकी, फरिद मलिक, नवीद झद्रन.
सामन्याची वेळ : दुपारी 2.30 पासून.