द. आफ्रिकेचा बांगलादेशवर विजय
वृत्तसंस्था/ दुबई
2024 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ब गटातील झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. दक्षिण आफ्रिकेतर्फे ब्रिट्सने सर्वाधिक म्हणजे 42 धावा जमविल्या.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकात 3 बाद 106 धावा जमवित दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 17.2 षटकात 3 बाद 107 धावा जमवित हा सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिट्सने 41 चेंडूत 5 चौकारांसह 42 तर अॅनिके बॉश्चने 25 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 53 धावांची भागिदारी केली. वुलव्हर्टने 7, ट्रायॉनने नाबाद 14 तर कॅपने नाबाद 13 धावा केल्या. बांगलादेशतर्फे फातिमा खातूनने 19 धावांत 2 गडी बाद केले. तत्पूर्वी बांगलादेशने 20 षटकात 3 बाद 106 धावा जमविल्या होत्या. बांगलादेशच्या डावात शोभना मोसेट्रीने 43 धावांत 38, कर्णधार निगार सुल्तानाने 38 चेंडूत 32 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे कॅप आणि मलाबा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - बांगलादेश 20 षटकात 3 बाद 106 (शोभना मोसेट्री 38, निगार सुल्ताना 32, कॅप आणि मलाबा प्रत्येकी 1 बळी), दक्षिण आफ्रिका 17.2 षटकात 3 बाद 107 (ब्रिट्स 42, बॉश्च 25, ट्रायॉन नाबाद 14, कॅप नाबाद 13, फातिमा खातून 2-19).