आफ्रिकेने बांगलादेशला नमवले, टेन्शन मात्र टीम इंडियाचे वाढले
बांगलादेशला व्हाईटवॉश, आफ्रिका दुसऱ्या कसोटीत डावाने विजयी : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप
वृत्तसंस्था/चितगाव
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान बांगलादेशवर 1 डाव व 273 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकत बांगलादेशला व्हाईटवॉश दिला. आफ्रिकेच्या या कसोटी मालिकेतील एकतर्फी विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी आणखी चुरस वाढली आहे. द.आफ्रिकन संघ गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केली आणि 575 धावांचा डोंगर रचला. टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स आणि मुल्डरने शतकी खेळी केली. दुसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेने 6 बाद 575 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला आणि बांगलादेशला फलंदाजीसाठी बोलवले. दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशच्या 34 वर 4 विकेट गेल्या होत्या. त्यामुळे हा सामना पूर्णत: आफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या 159 धावांवर ऑलआऊट झाला. यामुळे आफ्रिकेला 416 धावांची मोठी आघाडी मिळाली व त्यांनी बांगलादेशला फॉलोऑन दिला. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर डेन पीटरसन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
बांगलादेशी फलंदाज दुसऱ्या डावातही अपयशी
फॉलोऑननंतर खेळताना बांगलादेशचे फलंदाज दुसऱ्या डावातही सपशेल अपयशी ठरले. त्यांचा संपूर्ण संघ 43.4 षटकांत अवघ्या 143 धावांवर गारद झाला. कर्णधार नजमुल शांतोने 36 धावा केल्या तर हसन मेहमूदने 38 धावांचे योगदान दिले. आफ्रिकेकेडून केशव महाराजने 5 तर मुथुसामीने 4 गडी बाद केले. दरम्यान, शतकवीर टोनी डी झॉर्झीला सामनावीर तर कागिसो रबाडाला (मालिकेत 14 बळी) मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
फायनलसाठी चुरस, द.आफ्रिकाही शर्यतीत
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आफ्रिकेच्या या विजयानंतर मोठा फरक पडला आहे. गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत आफ्रिकेने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. आफ्रिकन संघाला आता फक्त दोन कसोटी मालिकेतील 4 सामने खेळायचे आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन संघ समोर असतील. विशेष म्हणजे हे सामने दक्षिण आफ्रिकेत होणार आहेत. आता, त्यांना फायनल गाठण्यासाठी उर्वरित चार पैकी दोन सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. सध्या गुणतालिकेत भारत व ऑस्ट्रेलिया हे दोन संघ अव्वल दोन क्रमांकावर आहेत. श्रीलंकन संघ तिसऱ्या, द.आफ्रिका चौथ्या तर न्यूझीलंड पाचव्या स्थानावर आहे. फायनलसाठी या पाचही संघात जोरदार चुरस पहायला मिळणार आहे.
संक्षिप्त धावफलक
द.आफ्रिका प.डाव 6 बाद 575 घोषित,बांगलादेश प.डाव 159 व दुसरा डाव 43.4 षटकांत सर्वबाद 143 (नजमउल शांतो 36, मेहमूद इस्लाम 29, हसन मेहमूद नाबाद 38, केशव महाराज 5 बळी तर मुथुसामी 4 बळी).