For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडला नमवत आफ्रिका उपांत्य फेरीत

06:55 AM Mar 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडला नमवत आफ्रिका उपांत्य फेरीत
Advertisement

 इंग्लंडच्या पराभवासह अफगाणिस्तानचेही पॅकअप : जोस बटलरच्या नेतृत्वाचा कडू शेवट : आफ्रिकेचा यान्सेन सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ कराची

येथील नॅशनल स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्यात द.आफ्रिकेने गटातील आपल्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा 7 गडी व 125 चेंडू राखून पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय आवश्यक होता. पण आफ्रिकेने पहिल्या डावात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ही शक्यता संपुष्टात आणली. इंग्लंडच्या पराभवासह अफगाणिस्तानचे देखील स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ब गटात आफ्रिकन संघ 5 गुणासह अव्वलस्थानी असून ऑस्ट्रेलियन संघ 4 गुणासह दुसऱ्या स्थानी राहिला. 

Advertisement

प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 179 धावांत ऑलआऊट झाला. आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचे स्टार फलंदाज सपशेल अपयशी ठरले. यानंतर विजयासाठीचे आव्हान आफ्रिकेने 29.1 षटकांत अवघ्या तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. रॉस्यू व्हॅन ड्युसेन व हेन्रिक क्लासेनने नाबाद अर्धशतके झळकावत आफ्रिकेच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सामन्यात तीन बळी व तीन झेल पकडत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या आफ्रिकेच्या मार्को यान्सेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

जोस बटलरच्या नेतृत्वाचा कडू शेवट

इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय अगदी चुकीचा ठरला. इंग्लंड संघ आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर फार काळ टिकू शकला नाही. संघातील एकही खेळाडू 40 धावाही करण्यात अपयशी ठरला. जो रूटने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. तर बेन डकेट 24, हॅरी ब्रुक 19, कर्णधार जोस बटलर 21, जोफ्रा आर्चर 25 धावा करत बाद झाले.  परिणामी संघ 179 धावांमध्ये सर्वबाद झाला. जो रुट वगळता इतर इंग्लिश फलंदाजांनी निराशा केल्यामुळे इंग्लंडचा संघ ऑलआऊट झाला. आफ्रिकेकडून मार्को यान्सेन आणि वियान मुल्डर यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले. तर केशव महाराज 2 विकेट आणि एन्गिडी-रबाडाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

क्लासेन-ड्युसेनची फटकेबाजी

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने अवघ्या 29 षटकांत विजय मिळवला. रायन रिकल्टनने 25 चेंडूत 27 धावा केल्या, तर ट्रिस्टन स्टब्स खातेही न उघडता आर्चरच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. यानंतर व्हॅन डेर ड्युसेनने 3 षटकार आणि 6 चौकारांसह सर्वाधिक 72 धावांची खेळी केली. तर दुखापतीतून परतलेल्या हेन्रिक क्लासेनने 56 चेंडूत 11 चौकारांसह 64 धावांची खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. तर डेव्हिड मिलरने विजयी षटकार लगावत संघाला मोठा विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून आर्चरने दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड 38.2 षटकांत सर्वबाद 179 (जो रुट 37, डकेट 24, जोफ्रा आर्चर 25, बटलर 21, यान्सेन व मुल्डर प्रत्येकी तीन बळी)

द.आफ्रिका 29.1 षटकांत 3 बाद 181 (रिकेल्टन 27, ड्युसेन नाबाद 72, क्लासेन 64, मिलर नाबाद 7, आर्चर दोन बळी).

Advertisement
Tags :

.