अफगाणचा पाकिस्तानला दणका
अफगाण संघ 18 धावांनी विजयी : अर्धशतकवीर इब्राहिम झद्रन सामनावीर
वृत्तसंस्था/ शारजाह
शारजाह येथे खेळल्या गेलेल्या तिरंगी टी-20 सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 18 धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 169 धावा केल्या. 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 9 गडी गमावून फक्त 151 धावा करू शकला. इब्राहिम झद्रन आणि सिद्दिकुल्लाह अटल यांच्यातील 113 धावांची भागीदारी आणि त्यानंतर फिरकी गोलंदाजांच्या घातक गोलंदाजीने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रारंभी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चौथ्या षटकापर्यंत अफगाणिस्तानचा स्कोअर फक्त 18 धावांवर होता. सलामीवीर रहमानउल्लाह गुरबाजचा स्वस्तात बाद झाला. पण यानंतर झद्रन (65) आणि अटल (64) यांनी जबाबदारी सांभाळली. दोघांनीही 113 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानच्या टी 20 इतिहासातील दुसऱ्या विकेटसाठीची दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली. तथापि, या दोघांव्यतिरिक्त, इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. अफगाण संघाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावत 169 धावा केल्या. पाककडून फहीम अश्रफने सर्वाधिक 4 गडी बाद केले.
पाकचे पॅकअप
170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकची सुरुवात खराब झाली. फजलहक फारुकी यांनी पहिल्याच षटकात अयुबला शून्यावर बाद केले. त्यानंतर, राशिद खान, नूर अहमद आणि मोहम्मद नबी या फिरकी त्रिकुटासमोर पाक फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली. तळाचा फलंदाज हॅरिस रौफने सर्वाधिक नाबाद 34 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे पाकला 9 बाद 151 धावापर्यंत मजल मारता आली. रौफने अखेरच्या काही षटकात हाणामारी करत विजयासाठी प्रयत्न केले, पण त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर अफगाण संघाने हा सामना 18 धावांनी जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. अफगाण संघाकडून रशीद खान, मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान 20 षटकांत 5 बाद 169 (इब्राहिम झद्रान 65, अटल 64, फहीम 4 बळी)
पाकिस्तान 20 षटकांत 9 बाद 151 (हॅरिस रौफ नाबाद 34, फखर झमन 25, सलमान आगा 20, रशीद, नूर अहमद आणि नबी प्रत्येकी दोन बळी)
गुणतालिकेत पाकला झटका
तिरंगी टी 20 मालिकेत अफगाणविरुद्ध पाकिस्तानची ही पहिली हार ठरली असून, गुणतालिकेत ते अव्वल स्थानावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी तीन-तीन सामने खेळले असून त्यापैकी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्हींचे समान चार-चार गुण आहेत. मात्र नेट रनरेटच्या आधारे अफगाणिस्तान वरचढ ठरला आहे. तिसऱ्या क्रमांकावर यूएईचा संघ आहे, ज्याने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे फायनलची संधी जिवंत ठेवायची असेल तर यूएईला पुढील दोन्ही सामने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्ध जिंकावे लागणार आहेत, पण ते आव्हान कठीण आहे. यूएईचा सामना पाकिस्तानशी गुरुवारी, तर अफगाणिस्तानशी शुक्रवारी होणार आहे. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.