महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अफगाणचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

06:58 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर : सुपर-8 सामन्यात उडवला 21 धावांनी धुव्वा

Advertisement

वृत्तसंस्था/ सेंट व्हिन्सेंट, वेस्ट इंडिज

Advertisement

मायदेशात प्रतिकूल परिस्थिती असताना अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी क्रिकेटवरील मेहनत कायम ठेवली. त्याच मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. टी-20 वर्ल्डकपमध्ये त्यांनी रविवारी झालेल्या सुपर-8 मधील सामन्यात कांगारुंचा 21 धावांनी फडशा पाडला. गतवर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानला विजयाची संधी होती पण ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावातामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पण त्या पराभवाचा बदला अफगाणिस्तानने आज घेतला. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर पहिलाच विजय आहे.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाचा संघ 19.2 षटकांत 127 धावांवर ऑलआऊट झाला. 20 धावांत 4 बळी घेणारा गुलबदिन नईब अफगाणच्या विजयाचा शिल्पकार ठरला. नवीन उल हकने 3 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. या विजयासह अफगाण संघाने उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत तर पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघ मात्र अडचणीत सापडला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आज भारताविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे.

गुरबाज, झद्रनची अर्धशतके

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने 20 षटकांत 6 गडी गमावत 148 धावा केल्या. सलामीवीर गुरबाजने 49 चेंडूंचा सामना करत 60 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. इब्राहिम झद्रानने 51 धावांची खेळी केली. त्याने 48 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार मारले. या जोडीने 16 षटकांत 118 धावांची सलामी दिली. दरम्यान, गुरबाजला स्टोनिसने बाद करत अफगाणला पहिला धक्का दिला. यानंतर मात्र अवघ्या 30 धावांत त्यांनी पाच विकेट गमावल्या. यामुळे अफगाण संघाने 20 षटकांत 6 बाद 148 धावा केल्या. यादरम्यान, पॅट कमिन्सने सलग दुसऱ्या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवली. याआधी कमिन्सने बांगलादेश सामन्यात हॅट्ट्रिक केली होती.

मॅक्सवेलची एकाकी झुंज, इतर फलंदाज फ्लॉप

विजयासाठीच्या 148 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कांगारुंनी अफगाण गोलंदाजासमोर शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. 19.2 षटकात 127 धावा करून ते ऑलआऊट झाले. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूंचा सामना करताना 59 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. मॅक्सवेल ज्यापद्धतीने खेळत होता, त्यावेळी असे वाटत होते की ऑस्ट्रेलियन संघ हा सामना सहज जिंकेल. पण गुलबदिन नईबने असे होऊ दिले नाही. त्याने ग्लेन मॅक्सवेलला नूर अहमदकडे झेलबाद करून अफगाणिस्तानला सामन्यात परत आणले. इतर ऑसी फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. कर्णधार मिचेल मार्श 12 धावा करून बाद झाला. मार्कस स्टोनिस 11 धावा करून बाद झाला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला खातेही उघडता आले नाही.

संक्षिप्त धावफलक

अफगाण 20 षटकांत 6 बाद 148 (रेहमानउल्लाह गुरबाज 60, इब्राहिम झद्रन 51, करीम जनत 13, नबी नाबाद 10, पॅट कमिन्स 3 बळी, अॅडम झम्पा 2 तर मार्क स्टोनिस 1 बळी).

ऑस्ट्रेलिया 19.2 षटकांत सर्वबाद 127 (मिचेल मार्श 12, मॅक्सवेल 59, स्टोनिस 11, नईब 4 तर नवीन उल हक 3 बळी).

पॅट कमिन्सची वर्ल्डकपमधील सलग दुसरी हॅट्ट्रिक

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने या विश्वचषकातील आपली सलग दुसरी हॅट्ट्रिक घेतली. त्याने बांगलादेशविरुद्ध सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवली होती यानंतर कमिन्सने अफगाणिस्तानविरुद्ध देखील ही कामगिरी करून दाखवली आहे. अशाप्रकारे पॅट कमिन्स टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. डावाच्या 18 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कमिन्सने रशीद खानला बाद केले. यानंतर 20 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर करीम जनत आणि गुलबदिन नईबला बाद झाले. टी 20 विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने घेतली होती. यानंतर कर्टिस कॅम्फर, वानिंदू हसरंगा आणि कागिसो रबाडा यांनी 2021 मध्ये, तर कार्तिक मयप्पन आणि जोशुआ लिटल यांनी 2022 मध्ये ही कामगिरी केली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पॅट कमिन्सने दोन वेळा हॅट्ट्रिक साजरी केली करत इतिहास रचला आहे.

अ गटात सेमीफायनलचे समीकरण बिघडलं

अफगाणिस्तानच्या विजयाने ऑस्ट्रेलियाचे सेमीफायनलचं समीकरण बिघडलं आहे. ‘अ‘ गटात अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी एक विजयासह बरोबरीत आहेत. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना भारताशी तर अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशशी खेळणार आहे. आता जर ऑस्ट्रेलिया भारताकडून हरला आणि अफगाणिस्तान बांगलादेशविरुद्ध जिंकला तर अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचेल. त्याचवेळी जर भारत ऑस्ट्रेलियाकडून हरला आणि बांगलादेशनं अफगाणिस्तानला पराभूत केले तर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचेल. जर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियन दोघांनी आपला शेवटचा सामना गमावला, तर रनरेटचं महत्त्व वाढेल. अशा स्थितीत ज्या संघाचा रनरेट जास्त असेल, तो उपांत्य फेरीत पोहोचेल.

ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे भारताचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. भारत पुढील सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हरला तर भारताचे 4 गुण होतील आणि ऑस्ट्रेलियाचेही 4 गुण होतील. दुसरीकडे, अफगाणने बांगलादेशविरुद्धचा पुढील सामना जिंकल्यास तिन्ही संघांचे गुण 4-4 गुण होतील. अशा परिस्थितीत ज्या संघाचा रनरेट चांगला असेल तो उपांत्य फेरीत पोहोचेल.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article