दक्षिण आफ्रिकेसमोर आज अफगाणिस्तानचे आव्हान
वृत्तसंस्था/ तारौबा (त्रिनिदाद)
अफगाणिस्तान टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात आज गुरुवारी दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहेत. या लढतीचा निकाल कसाही लागला, तरी ती ऐतिहासिक असेल. अफगाणिस्तान हा यंदाच्या स्पर्धेतील सर्वांत लक्षवेधी संघ राहिला आहे. यादरम्यान 2021 च्या विजेत्या ऑस्ट्रेलियावर त्यांनी चकीत करणारा विजय मिळविला. यापूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियाला कधीही हरवले नव्हते.
अफगाणिस्तानच्या या यशात कर्णधार रशिद खान, वेगवान गोलंदाज फझलहक फाऊकी आणि नवीन-उल-हक, ऑसीजविऊद्ध ज्याने जादुई कामगिरी केली तो गुलबदिन नायब, मोहम्मद नबी असे अनेक नायक आहेत. त्यांचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज 281 धावांसह फलंदाजीच्या यादीत आघाडीवर आहे, तर फाऊकी 16 बळीसह गोलंदाजीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. अफगाणिस्तानच्या या दोन खेळाडूंनी काही मोठ्या नावांना मागे टाकून हे शीर्षस्थान पटकावले आहे.
अफगाणिस्तान हा कुशल संघ असून तीव्र स्पर्धेस ते अपरिचित नाहीत. पण ते कधीच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत यापूर्वी सहभागी झालेले नाहीत. मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी प्रसंग मोठा असला म्हणून आपला संघ विचलित झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकी संघही 1991 मध्ये जागतिक क्रिकेटमध्ये पुन्हा प्रवेश घेतल्यानंतर टी-20 किंवा 50 षटकांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकलेले नाहीत. या स्पर्धेत त्यांना नेपाळ, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध निसटते विजय मिळालेला आहेत. परंतु त्याचबरोबर एडन मार्करमच्या संघाने उल्लेखनीय धैर्य दाखवून साऱ्या अडचणींतून बाहेर सरून शेवटी विजय मिळविल्याचे दिसून आलेले आहे.
सामन्याची वेळ : सकाळी 6 वा.