अफगाणचा झिम्बाब्वेवर कसोटी मालिका विजय
रेहमत शहा ‘मालिकावीर’, रशिद खान ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / बुलावायो
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत अफगाणने यजमान झिम्बाब्वेचा 1-0 असा पराभव केला. या मालिकेतील येथे सोमवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणने झिम्बाब्वेवर 72 धावांनी विजय मिळविला. अफगाणच्या रेहमत शहाला ‘मालिकावीर’ तर रशिद खानला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या दुसऱ्या सामन्यात अफगाणचा पहिला डाव 157 धावांवर आटोपल्यानंतर झिम्बाब्वेने पहिल्या डावात 243 धावा जमवित 86 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर अफगाणने दुसऱ्या डावात 363 धावा जमवित झिम्बाब्वेला निर्णायक विजयासाठी 278 धावांचे आव्हान दिले. पण अफगाणच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा दुसरा डाव 205 धावांत आटोपल्याने त्यांना ही मालिका गमवावी लागली.
झिम्बाब्वेने 8 बाद 205 या धावसंख्येवरुन सोमवारी शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण त्यांचे शेवटचे दोन गडी एकाही धावाची भर न घालता तंबूत परतले. झिम्बाब्वेच्या दुसऱ्या डावात कर्णधार इर्व्हिनने 103 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 53, सिकंदर रझाने 83 चेंडूत 2 चौकारांसह 38, बेन करणने 51 चेंडूत 5 चौकारासह 38, कैतानोने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21, सीन विलियम्सने 2 चौकारांसह 16 धावा केल्या. खेळाच्या शेवटच्या दिवशी पावसामुळे मैदान ओलसर असल्याने खेळाला उशीरा प्रारंभ करण्यात आला. नाबाद राहिलेला निगरेव्हा 3 धावांवर धावचित झाला तर कर्णधार इर्व्हिन शेवटच्या गड्याच्या रुपात तंबूत परतला. रशिद खानने त्याला पायचित केले. अफगाणतर्फे रशिद खान सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 66 धावांत 7 तर झिया ऊर रेहमानने 44 धावांत 2 गडी बाद केले. या दुसऱ्या कसोटीत रशिद खानने एकूण 11 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: अफगाण प. डाव 157, झिम्बाब्वे प. डाव 73.3 षटकात सर्वबाद 243, अफगाण दु. डाव 113.5 षटकात सर्वबाद 363, झिम्बाब्वे दु. डाव 68.3 षटकात सर्वबाद 205 (इर्व्हिन 53, बेन करण 38, सिकंदर रझा 38, सिन विलियम्स 16, गुंबी 15, अवांतर 15, रशिद खान 7-66, झिया ऊर रेहमान 2-44)