अफगाणचा झिम्बाब्वेवर मालिका विजय
एस. अटल ‘मालिकावीर’, गझनफर ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / हरारे
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणने यजमान झिम्बाब्वेचा 2-0 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात अफगाणने झिम्बाब्वेचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. अफगाणच्या एस. अटलला ‘मालिकावीर’ तर गझनफरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात अफगाणने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजी दिली. अफगाणच्या भेदक माऱ्यासमोर झिम्बाब्वेचा डाव 30.1 षटकात 127 धावांत आटोपला. त्यानंतर अफगाणने 26.5 षटकात 2 बाद 131 धावांत जमवित हा सामना 8 गड्यांनी जिंकत मालिकाही हस्तगत केली. अफगाणच्या गझनफरने 33 धावांत 5 गडी बाद केले.
झिम्बाब्वेच्या डावात विलियमसने 61 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 60 तर सिकंदर रझाने 2 चौकारांसह 13 आणि निगरेव्हाने 1 चौकारांसह 10 धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. झिम्बाब्वेच्या डावात 3 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे गझनफरने 33 धावांत 5 तर रशिद खानने 38 धावांत 3 तसेच फरिद अहम्मद व ओमरझाई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणच्या डावात सलामीच्या एस. अटलने 50 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 52, अब्दुल मलिकने 4 चौकारांसह 29, रेहमत शहाने 2 चौकारांसह नाबाद 17 आणि कर्णधार शाहीदीने 3 चौकारांसह नाबाद 20 धावा जमविल्या. झिम्बाब्वेतर्फे निगरेव्हा, वेंडू यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: झिम्बाब्वे 30.1 षटकात सर्वबाद 127 (विलियमस 60, रझा 13, निगरेव्हा 10, गझनफर 5-33, रशिद खान 3-38), अफगाण 26.5 षटकात 2 बाद 131 (एस. अटल 52, अब्दुल मलिक 29, रेहमत शहा नाबाद 17, शाहीदी नाबाद 20, अवांतर 13)